सामान्य भक्तांचा तिटकारा; श्रीमंतांना मात्र रेड कार्पेट

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येताना दिसत आहे. अशोक खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा समावेश होता. गरीब आणि सामान्य घरातील लोकांकडून फारसे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने अशोक खरात त्यांच्याकडे फारसे लक्षही देत नव्हता. सामान्यांना तो भेटीची वेळही देत नसत. मात्र, श्रीमंत भक्तांसाठी हा भोंदू अशोक खरात रेड कार्पेट अंथरायचा, अशी चर्चा आता रंगत आहे.
अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. हे भक्त अशोक खरातला घसघशीत दक्षिणाही द्यायचे. यांपैकी काही भक्त हे अशोक खरातला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्महाउस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असत. अशा एका आउटडोअर व्हिजिटसाठी अशोक खरात तब्बल पाच लाख रुपये घेत होता. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशोक खरात याच्या नाशिकमधील बंगल्यावर आणि कार्यालयात बड्या भक्तांची मोठी गर्दी असे. याठिकाणी खरातचा दरबार भरत असे. त्यामुळे या परिसरात अनेक महागड्या कार दिसायच्या. तांत्रिक विधींच्या दृष्टीने अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने हे श्रीमंत भक्त अशोक खरात याने याच दिवशी आपल्यासोबत यावे यासाठी आग्रही असत. या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असे, अशी माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आल्याचे समजते.
पुण्यातील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करून घेतली होती.
अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित महिलांना घेऊन खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात सीन रिक्रिएशन केले होते. यावेळी त्याच्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी काही औषधे आणि रत्न सापडल्याची माहिती समोर आली होती.

Hatred of ordinary devotees; red carpet for the rich

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *