पतीमुळे संकटात; माहेर मात्र आजही संघर्षाच्या छायेत
सिन्नर : प्रतिनिधी
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणार्या अशोक खरात याच्या अटकेनंतर उघड होत असलेल्या घटनाक्रमामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे ऐषोरामी जीवन जगणारी त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याही आयुष्यावर संकटाचे ढग दाटले आहेत. विशेष म्हणजे, सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील तिचे माहेर आजही गरिबी आणि दु:खाच्या सावटाखाली जगत असल्याची हृदयस्पर्शी बाजू या प्रकरणातून पुढे आली आहे.
फसवणुकीच्या एका गुन्ह्यात कल्पना खरात हिचाही शोध पोलिसांकडून सुरू असून, तिच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांचे पथक नाशिकमधील कर्मयोगीनगर परिसरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यावरही पोहोचले होते. मात्र, त्याआधीच ती फरार झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) तिचा मुलगा हर्षवर्धन याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
गरिबीमुळे जुळले लग्न
अशोक खरात यांचे वय वाढल्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते. त्यावेळी एका नातेवाइकाने पाडळी येथील प्रभाकर शिंदे यांची मुलगी कल्पना हिच्याशी त्याचा विवाह जुळवून आणला. दोघांमध्ये तब्बल 12 ते 15 वर्षांचे वयाचे अंतर होते. मात्र, घरची बिकट परिस्थिती आणि लग्नाचा संपूर्ण खर्च खरात कुटुंबीयांनी उचलण्याची तयारी दर्शविल्यामुळे मुलीचे लग्न अशोक खरात याच्याशी लावून दिल्याचे ग्रामस्थ सांगतात.
लग्नानंतर बदलले आयुष्य
लग्नानंतर कल्पनाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पाडळीतील गरिबीच्या घरातून ती ऐषोरामी जीवनात गेली. मात्र, त्यानंतर माहेरशी तिचे संबंध हळूहळू कमी झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध आई, विधवा भाऊजय आणि भाच्याला भेटण्यासाठी ती क्वचितच गावात येत असे.
भावाकडे हार्डवेअर दुकानाचा कारभार
कल्पनाचा लहान भाऊ हा मात्र खरात कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. सिन्नर-शिर्डी महामार्गावरील जुन्या केला कंपनीजवळ असलेल्या दुकानाचा कारभार तो पाहत असल्याची माहिती मिळते. तो सध्या सिन्नर येथे वास्तव्यास असल्याचे समजते. दुसरा भाऊ नाशिक येथे वास्तव्यास असल्याचेही सांगितले जाते.
ऐषोरामातून अचानक संकटात
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर चर्चा रंगली असताना त्याची पत्नी पूर्वाश्रमीची सुनीता आणि आताची कल्पना खरात हिच्या आयुष्याची कहाणी मात्र गरिबी, नंतरच्या काळात जगलेले ऐषोरामी जीवन आणि अचानक आलेले संकट अशा भावनिक पैलूंनी समोर येत आहे. पाडळी गावात मात्र तिच्या माहेरच्या जुन्या घरात आजही संघर्षाचेच वास्तव दिसत आहे.
The ‘imagination’ that went from poverty in the slums to ‘luxury’