भोंदू खरातची तब्बल 130 बँक खाती

चाकणकरांच्या बहीण अन् पुतण्यांच्या नावे बनावट अकाउंंट

सर्व खात्यांमध्ये अशोक खरातच ‘नॉमिनी’ शिर्डीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा

नाशिक : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात याच्या फसवणूक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिर्डीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला आहे. खरातने तब्बल 130 बनावट बँक खाती उघडून कोट्यवधींंची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2021-22 या कालावधीत विविध व्यक्तींच्या नावाने पतसंस्थांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था यांसह अनेक ठिकाणी ही बनावट खाती तयार करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच ‘नॉमिनी’ म्हणून दाखवण्यात आले होते. या खात्यांतून एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
या बनावट खात्यांमधून एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावांचाही वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जासूद आणि चाकणकर यांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावांचाही वापर करण्यात आल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.
शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली आहे.
सावकारकी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू ठेवला आहे.

As many as 130 bank accounts of Bhondu Kharat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *