इराणमधील सर्वांत उंच पूल उद्ध्वस्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भीषण युद्धाचा इशारा

वॉशिंग्टन / तेहरान :
पश्चिम आशियातील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणमधील सर्वार्ंत उंच आणि महत्त्वाचा असलेल्या ’बी-1’ पुलावर हल्ला करून तो उद्ध्वस्त केल्याची अधिकृत घोषणा केली. इराणमध्ये जे काही शिल्लक आहे, ते उद्ध्वस्त करण्यास आम्ही अजून सुरुवातही केलेली नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या युद्धाची भीती पसरली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागॉन) दिलेल्या माहितीनुसार, कराज येथील हा पूल इराणच्या लष्करी पुरवठा साखळीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या पुलावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराणची दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या पुलाच्या विध्वंसाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, इराणमधील सवार्ंत मोठा पूल आता इतिहासजमा झाला आहे. जर इराणने चर्चा केली नाही, तर येत्या दोन-तीन आठवड्यांत आम्ही त्यांना ’पाषाणयुगात’ पाठवू.
दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने (आयआरजीसी) असा दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 लढाऊ विमान पाडले आहे.
गेल्या महिनाभरात इराणने अमेरिकन विमान पाडल्याचा हा
दुसरा दावा आहे. मात्र, अमेरिकेने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
’अमेरिकेचे नैतिक पतन’
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. अपूर्ण राहिलेले आणि नागरी सुविधांचे पूल पाडणे हे शत्रूच्या पराभवाचे आणि नैतिक पतनाचे लक्षण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 95 हून अधिक लोक जखमी झाल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले.

इराणकडून ’हिटलिस्ट’ जारी

आपल्या नागरी सुविधांवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराणने आखाती देशांतील आठ प्रमुख पुलांची ’हिटलिस्ट’ जाहीर केली आहे. यामध्ये कुवेतचा शेख जाबेर अल-अहमद पूल आणि सौदी-बहारिनला जोडणारा किंग फहद कॉजवे यांचा समावेश आहे. इराणच्या निमसरकारी ’फार्स’ या वृत्तसंस्थेने ही यादी प्रसिद्ध करत, या पुलांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

जागतिक बाजारपेठेत मोठे संकट

वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इराणने ’हॉर्मुझची सामुद्रधुनी’ रोखल्यास जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, या भीतीपोटी शेअर बाजार आणि तेल बाजारात घबराट पसरली आहे. हे युद्ध प्रदीर्घ काळ चालण्याची चिन्हे दिसत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

 

 

 

 

 

Iran’s highest bridge destroyed

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *