♦ सोसायट्यांची संपूर्ण भिस्त खासगी टँकरवरच.
♦ विजेच्या लपंडावाने उकाड्याचा त्रास.
♦ पैसे देऊनही टँकर उपलब्ध नाही.
♦ पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा.
नाशिक : प्रतिनिधी
शहरात शनिवार (दि. 4) व रविवार (दि. 5) असे दोन दिवस पाणी पुरवठ्याबाबत घेतलेल्या शटडाउनमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः रविवारी संपूर्ण शहरात पाण्यासाठी वणवण झाल्याचे दिसले. खासगी टँकरसुद्धा वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागल्याचे चित्र होते. पैसे देऊनही टँकर मिळाले नाहीत. महापालिकेने आगाऊ सूचना दिली असली, तरी बहुतांश नागरिकांसह सोसायट्यांकडे पुरेसा पाणीसाठा करण्याची सुविधा नसल्याने दुपारनंतरच टाक्या कोरड्या पडल्या. कूपनलिका नसलेल्या सोसायट्यांची भिस्त खासगी टँकरवरच असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी वाढली.
नाशिक महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व जोडणीसाठी घेतलेल्या 48 तासांच्या शटडाउनचा फटका रविवारी (दि.5) दुसर्या दिवशीही नागरिकांना तीव्रतेने बसला. शनिवारी (दि.4) पहिल्या दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहिल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागली. उपनगर उपकेंद्रातून जाणार्या 11 केव्ही डीजीपीनगर फीडरवरील दुरुस्ती कामासाठी रविवारी (दि. 5) पहाटे 5 ते 9 या वेळेत वीजपुरवठा बंद जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत डीजीपीनगर, साई संतोषीनगर, वडाळागाव, म्हाडा परिसर, एसएन पार्क, मदिनानगर, गुलशननगर, सादिकनगर, साठेनगर, विधातेनगर, तैबानगर आदी भागांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
मात्र, नियोजित वेळ संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. साठेनगर, सादिकनगर, महेबूबनगर येथे काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत झाला असला, तरी तैबानगर, गणेशनगर येथे विलंब झाला. मखदूमनगर, मदिनानगर, एसएन पार्क परिसरात अर्धा ते एक तास अतिरिक्त विलंब झाल्याने नागरिकांना उकाड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर वडाळागाव, जुने नाशिक, शालिमार, मेनरोड, अशोक स्तंभ, महात्मा गांधी रोड आदी भागांमध्ये दिवसभर अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या. आधी दोन दिवस पाणी नाही, त्यात सतत वीजपुरवठा खंडित होत होता. उकाड्यात घरात बसणेही कठीण झालेे होते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. टँकर चालकांकडून रात्री बुकिंग करणार्यांना दुसर्या दिवशी सकाळीच पाणी मिळाल्याचे दिसले. एरवी 700 ते 900 रुपयांत मिळणारा टँकर 1300 तेे 1500 रुपयांपर्यंत दराने विकला जात होता. तोही किमान 12 तासांच्या प्रतीक्षेनंतर मिळत असल्याने नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी तर पैसे देऊनही टँकर उपलब्ध नसल्याने नागरिकांना किरकोळ वापरासाठी पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागल्या.
दरम्यान, टँकरचालकांनाही विहिरींवर पाणी भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याने अडचणी निर्माण झाल्या. एका टँकरला पाणी भरण्यासाठी जवळपास दोन तास लागत असल्याने दिवसाला मर्यादितच फेर्या मारता येत आहेत. त्यामुळे अनेकांनी बुकिंग घेणे टाळल्याचे समोर आले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गंगापूर धरण परिसरात क्रॉसिंगचे काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले आहे. गांधीनगर व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र परिसरातही 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. नियोजित वेळेपेक्षा कमी कालावधीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले. प्रभाग 23 मधील भारतनगर, शिवाजीवाडी परिसरात मागील आठ दिवसांपासूनच विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्यात मागील दोन दिवसांपासून पाण्याचा थेंबदेखील न मिळाल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
दरम्यान, पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय महापालिकेने पाणीपुरवठा बंद करू नये. अगोदरच नळाला पाणी येत नाही. येते तेव्हा फक्त एक हंडाही भरत नाही. त्यामुळे घरातील सर्व कामे ठप्प होतात.
नागरिकांना प्रचंड मनस्ताप
नाशिक महापालिकेने दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची पूर्वसूचना देताना नागरिकांसाठी टँकरची व्यवस्था केल्याचे जाहीर केले होते. तसेच काही अधिकार्यांचे संपर्क क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर फोन बंद होतेे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शहरात एकीकडे तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली असताना दुसरीकडे महापालिकेच्या 48 तासांच्या शटडाउनमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
Two-day water supply shutdown leaves people in distress