तृणमूलच्या पापांचा हिशोब घेणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली असून, घुसखोरांना बाहेर काढले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच टीएमसीवर भ्रष्टाचार, हिंसा आणि कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदी म्हणाले की, कूचबिहारमधील सभा ही बंगालमधील जनतेच्या बदलाच्या मनःस्थितीचे प्रतीक आहे. राज्यात टीएमसीच्या भ्रष्टाचार, हिंसा आणि प्रशासनातील अपयशामुळे जनतेमध्ये मोठा संताप आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील ब्रिगेड ग्राउंडवरून बंगालमध्ये परिवर्तन महाअभियानाची सुरुवात करण्यात आली होती. त्या सभेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून टीएमसी घाबरली आहे आणि आता कूचबिहारच्या सभेने त्या परिवर्तनाच्या बिगुलावर शिक्कामोर्तब केले आहे.
निवडणुकीनंतर कारवाईचा इशारा मोदी यांनी टीएमसीवर आरोप करताना म्हटले की, एकीकडे टीएमसीचे कटमनी, भ्रष्टाचार आणि सिंडिकेट राज आहे, तर दुसरीकडे विकास आणि विश्वास देणारी भाजप आहे. निवडणुकीनंतर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल. 4 मेनंतर कायदा आपले काम करेल. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी यावेळी न्याय होणार, असे आश्वासन मोदींनी दिले.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा
मोदींनी संदेश खली प्रकरणाचा उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी भाजप सरकार काम करेल. देशातील तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात आले. लोकसभा व विधानसभांत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना त्याचा फायदा मिळेल.
A wave of change in Bengal in the elections