ओझर : वार्ताहर
येथील मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक टेक्स्टाइलसमोर मोटारसायकलला मागून येणार्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर महिला गंभीर जखमी झाली.
शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास काबूल कासम शेख (वय 53) व नसरीन नजीर शेख (दोघ रा. चांदणी चौक, ओझर) हे स्प्लेंडर मोटारसायकलने (एमएच 15- एफवाय 9769) दहावा मैल येथून ओझरला येत असताना मागून भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (आयएनडी 25-बीएच 7075 एल) नाशिक टेक्स्टाइलसमोर मोटारसायकलला धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार काबूल शेख यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर मार व दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर नसरीन शेख गंभीर जखमी झाल्या. अपघाताचे वृत्त समजताच ओझरचे पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, हवालदार रावसाहेब मोरे, शिपाई वाघ व पोलिस नाईक आर. आर. शिंगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेस रुग्णालयात दाखल केले.
काबूल शेख यांचा मृतदेह पिंपळगाव रुग्णालयात पाठविला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर चालक कार सोडून पळून गेला. यासंदर्भात अपघाताची नोंद केली आहे. ओझर पोलीस तपास करीत आहेत.
Biker killed in car accident in Ozer