तरुणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न; फरार चार आरोपींना अटक

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
तरुणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार असलेल्या चार संशयितांना गुंडविरोधी पथकाने शिताफीने पकडले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी महेश तुकाराम गवळी (रा. नाशिकरोड) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नॅशनल लॉजच्या गेटसमोर बसलेले असताना पूर्वी लॉजच्या पैशावरून वाद झालेले संशयित चार युवक आले. बळजबरीने कारमध्ये बसवून संशयित प्रथमेश सोनवणे याने फिर्यादीच्या पोटाला चाकू मारून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यास शांती पार्क, उपनगर येथील एका पडीक इमारतीत घेऊन जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली.
या प्रकरणात संशयित रवी शिंदे, नारायण नागपुरे यांनी हातातील कोयते उलटे करून फिर्यादीच्या गुडघ्यावर मारून प्रथमेश सोनवणे आणि अभय औटे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या पाठीत, हातापायांवर मारहाण केली. त्यास जखमी करून ठार मारण्याच्या उद्देशाने चौघांनी त्यांचे हातपाय धरून इमारतीवरून खाली फेकून दिले. त्यात फिर्यादीस गंभीर दुखापत होऊन पाठीचा मणका फॅक्चर झाला. यानंतर संशयित फरार झाले होते.
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी तत्काळ घटनास्थळावर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुढे रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, सिटी सेंटर मॉल येथील फुटेजची बारकाईने तपासणी केली. गुन्ह्यातील आरोपी व त्यांनी वापरलेली कार (एमएच 12- ईटी 5690) सातपूर परिसरात गेल्याचे निष्पन्न केले.
आरोपी मोतीवाला कॉलेजजवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाने मोतीवाला कॉलेजजवळील पाटालगत सापळा लावला. यात संशयित नारायण संभाजी नागापुरे (32, रा. फ्लॅट नं 7, धनदाई पॅलेस, शिवाजीनगर, सातपूर), प्रथमेश संतोष सोनवणे (21, रा. कपालेश्वर रो-हाउस नं. 8, शिवाजीनगर, सातपूर), रवी अशोक शिंदे (26, रा. आगर टाकळी, वैदूवाडी), अभय रामभाऊ औटे (23, रा. पारिजात अपा. शिवाजीनगर, आंबेडकरनगर) यांना ताब्यात घेतले.त्यांना पुढील तपासकामी नाशिकरोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव,
घनःश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरीत्या कामगिरी पार पाडली.

Attempt to kidnap and kill a young man; Four absconding accused arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *