युद्धविराम

अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित

महायुद्धाची टांगती तलवार टळली! पाकिस्तानात होणार ऐतिहासिक शांतता बैठक; ‘पूर्ण विजय’चे दावे-प्रतिदावे

वॉशिंग्टन/तेहरान :

गेल्या सव्वा महिन्यापासून
मध्यपूर्वेत रक्तरंजित युद्धाची झळाळी पसरलेल्या अमेरिका-इराण संघर्षात अखेर कल रात्री उशिरा ऐतिहासिक, पण तात्पुरता युद्धविराम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ सामुद्रधुनी ताबडतोब आणि सुरक्षितपणे उघडण्याच्या अटीवर दोन आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा केली. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही हा करार स्वीकारला असून, दोन्ही बाजू ‘विजया’चा दावा करत आहेत. येत्या शुक्रवारी, 10 एप्रिल रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे शांतता चर्चेला सुरुवात होईल. युद्धविरामानंतरच्या पहिल्या 24 तासांत तेलाच्या किमती घसरल्या. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घोषणेचे स्वागत केले, पण इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध हल्लेे सुरू ठेवल्याने परिस्थिती अद्याप नाजूकच आहे.

ट्रम्प यांचा दावा: ‘पूर्ण विजय’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर लिहिले आहे की, ही दोन्ही बाजूंची युद्धविरामाची घोषणा आहे! आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि दीर्घकालीन शांततेच्या कराराकडे खूप जवळ आलो आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टोटल अँड कंप्लीट व्हिक्टरी’चा दावा करत सांगितले, 100 टक्के, कोणतीही शंका नाही.

इराणचा प्रतिदावा आणि 10 सुत्री प्रस्ताव

इराणकडून मात्र याला ‘मैदानातील विजय’ म्हटले गेले. इराणने 10 सूत्री प्रस्ताव दिला, ज्यात युद्ध संपुष्टात आणणे, अमेरिकी निर्बंध हटवणे, नुकसानभरपाई आणि पुनर्निर्माण यांचा समावेश होता. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीवर दोन आठवडे सुरक्षित वाहतूक होईल आणि ती इराणी सशस्त्र दलांच्या समन्वयाने चालेल.

युद्धविरामानंतरच्या महत्वाच्या घडामोडी

होर्मुझ सामुद्रधुनी : काही तासांतच जहाजांची सुरक्षित वाहतूक सुरू
तेल बाजार : किमतीत मोठी घसरण; जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा
इस्रायलची भूमिका : युद्धविरामाचे स्वागत; पण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध कारवाई सुरूच
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया : संयुक्त राष्ट्र, जर्मनी, ब्रिटनकडून सकारात्मक प्रतिसाद

 

 

 

Armistice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *