रुग्णहक्क सनदकडे पाठ, रुग्णालयांना नोटिसा

आरोग्य विभागाकडून रुग्णालयांची तपासणी

नाशिक : प्रतिनिधी
रुग्णालयाच्या दर्शनीय भागात रुग्णहक्क सनद व उपचार दरपत्रक न लावणार्‍या रुग्णालयांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील रुग्णालयांत जाऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी काही रुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत.
दरम्यान, दीड वर्षापूर्वी महात्मानगरमधील डॉ. पंड्या हॉस्पिटलमधील अवैध गर्भपाताचे प्रकरण आणि मुंबई नाक्यावरील मालती आयव्हीएफ सेंटरमधील गडबडीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील खासगी 657 रुग्णालये व दवाखान्यांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत तीनशे रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी मुंबई नाक्यावरील मालती आयव्हीएफ सेंटरमुळे महापालिकेची परवानगी चर्चेचा विषय बनली होती. त्यात रुग्णालयाच्या दर्शनीय भागात रुग्णहक्क सनद व उपचार दरपत्रक याची माहिती लावली जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रुग्णालयांची वर्षातून दोनदा अर्थात, सहामाही तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. आतापर्यंत तीनशे रुग्णालये व दवाखान्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित रुग्णालयांचीही तपासणी सुरू आहे. त्यात रुग्णालयांकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे रुग्णालयांत खळबळ उडाली आहे.

ही पूर्तता करणे आवश्यक
मुंबई शुश्रूषागृह अधिनियम 1949 सुधारित नियम 2006 नुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्येक रुग्णालय, नर्सिंग होम, शुश्रूषागृह यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करणे व दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अनेक रुग्णालयांची नोंदणी नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यात दीड वर्षापूर्वी महात्मानगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत सर्रास अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचे आढळल्यानंतर खळबळ उडाली होती.

काही रुग्णालयांकडून तपासणी पथकाला सहकार्य केले जात नसल्याचे समोर येत असल्याने, त्या रुग्णालयांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत. पथकाकडून सर्व रुग्णालये, प्रसूतीगृहे, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रांची वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.
– डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, मनपा

Reference to the Patient Rights Charter, notices to hospitals

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *