शिंदे, नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका ऑइल कंपनीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर ऑइल ड्रमचे नुकसान झाले असून, कंपनीला आग लागल्याने ऑइलचे ड्रम फुटल्याने मोठमोठे आवाज येत होते व काही यंत्रसामग्री आगीत जळून खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेली पाच- सहा वर्षांपासून आपल्या स्वमालकीची असणारी ऑइल कंपनी अचानक रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग भडकली. मोठ्या प्रमाणावर ऑइल कंपनीत असल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली तर दूरध्वनीवरून आग विझविण्यासाठी नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, तर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
Massive fire breaks out at oil company in Shinde