सिडको : प्रतिनिधी
जुने सिडको परिसरातील इंदिरा गांधी वसाहत येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी दगडफेक करत दोन वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी अचानक काही तरुणांनी परिसरातील उभ्या वाहनांना लक्ष्य केले. त्यांनी दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. हा प्रकार अचानक घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी तत्काळ बाहेर येत परिस्थितीचा आढावा घेतला; मात्र तोपर्यंत संबंधित तरुण घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.
Stone pelting in Indira Gandhi Colony; Two vehicles damaged