चाळीस गावे, 87 वाड्यांमध्ये टँकर
नाशिक : प्रतिनधी
2024 च्या तुलनेत 2025 मध्ये सरासरी पावसात घट झाली. परिणामी, जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मार्च महिन्यापासून बसणार्या पाणीटंचाईच्या झळा एप्रिल महिन्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. सध्या जिल्ह्यात 40 गावे व 87 वाड्यांवरील पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
1 जून ते 31 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्ह्यात 1 हजार 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर 2025 मध्ये मात्र पावसाच्या प्रमाणात घट होऊन 772.2 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कमी झालेला पाऊस आणि त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालले आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने 40 गावांसह 87 वाड्यांवर 44 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच 16 विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
येवल्यामध्ये सर्वाधिक 16 गावे व 8 वाड्या अशा एकूण 31 ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आहे. त्याखालोखाल इगतपुरीमध्ये 7 टँकर सुरू करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होणार असून, ग्रामीण भागामध्ये मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.
सात कोटींचा आराखडा
जिल्हा प्रशासनच्या जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाणी टंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2015 ते जून 2026 या कालावधीपर्यंत हा आराखडा असून, सात कोटी 38 लाख 25 हजार रुपयांची तरतूद यामध्ये विविध उपाययोजनेसाठी करण्यात
आली आहे.
162 टँकरचे नियोजन
260 गावांसह 586 वाड्यांवर एकूण 486 ठिकाणी 162 टँकरद्वारे फेर्या करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी टंचाई कृती आराखड्यात सहा कोटी 36 लाख 48 हजार रुपयांची तरतूद आहे.
जिल्ह्यातील पाणी स्थिती
एकूण गावे व वाड्या – 187
प्रभावित लोकसंख्या – 74395
सुरू असलेले टँकर – 44
तालुकानिहाय पाणीपुरवठा
चांदवड- 4 गावे, 2 वाड्या, देवळा- 1 गाव, 3 वाड्या, इगतपुरी – 3 गावे, 24 वाड्या, मालेगाव -6 गावे, 23 वाड्या, पेठ -3 गावे, 1 वाडी, सिन्नर -26 वाड्या, येवला -23 गावे, 8 वाड्या.
Nashik district faces water shortage