फोटोग्राफी व्यवसायाला प्री-वेडिंगची ‘क्लिक’

मोबाइलमुळे परिणामाची भीती ठरली फोल

प्री-वेडिंगसाठी गोदाकाठाला पसंती
आउटिंगवरही भर
पंधरा हजारांपासून पॅकेज
आधुनिकता, पारंपरिक टच
तंत्रज्ञानाचा अफलातून वापर

नाशिक : प्रतिनिधी
मोबाइलमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे उपलब्ध झाल्यानंतर फोटोग्राफी व्यवसायावर मोठा परिणाम होईल, अशी भीती काही वर्षांपूर्वी व्यक्त केली जात होती. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने सामान्य फोटो काढण्यासाठी व्यावसायिक फोटोग्राफरची गरज कमी झाली होती. मात्र, काळानुरूप बदल स्वीकारत फोटोग्राफी क्षेत्राने नव्या संकल्पनांना कवटाळले आणि आज या व्यवसायाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले असल्याचे नाशिकमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत लग्नसोहळ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपरिक पद्धतींपेक्षा आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने लग्नसोहळे साजरे करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. याचाच एक भाग म्हणून प्री-वेडिंग शूट हा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय झाला आहे. लग्नाआधीच जोडपी वेगवेगळ्या निसर्गरम्य किंवा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन फोटो आणि व्हिडिओ शूट करत आहेत. या शूटसाठी विशेष संकल्पना, थीम, वेशभूषा आणि सिनेमॅटिक शैलीचा वापर केला जात असल्याने या क्षेत्रात सर्जनशीलतेला मोठी संधी मिळत आहे.
नाशिक शहर आणि परिसर हा नैसर्गिक व धार्मिक वारशाने समृद्ध असल्यामुळे प्री-वेडिंग शूटसाठी आदर्श ठिकाण ठरत आहे. इगतपुरीतील डोंगररांगा, त्र्यंबकेश्वरचे धार्मिक वातावरण, अंजनेरी पर्वत, गोदाघाटाचा ऐतिहासिक वारसा, गंगापूर धरणाचे बॅकवॉटर, सुला वायनरीचा आधुनिक लूक, पांडवलेणीचे प्राचीन सौंदर्य, खंडोबा टेकडी आणि बोटॅनिकल गार्डन यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शूटिंग होत आहे. याशिवाय, शहरातील जुने वाडे आणि हेरिटेज वास्तूंनाही विशेष मागणी आहे. या माध्यमातून नाशिकची ओळख राज्याबाहेरील तसेच देशभरातील लोकांपर्यंत पोहोचत असून, पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.
प्री-वेडिंग शूटसोबतच मॅटर्निटी शूट आणि बेबी बॉर्न शूट यांसारख्या संकल्पनांनाही मोठी मागणी वाढली आहे. बाळाच्या आगमनाचा आनंद, गर्भावस्थेतील भावनिक क्षण आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे दिवस जतन करण्यासाठी कुटुंबांकडून या शूटला प्राधान्य दिले जात आहे. विशेष सेट, प्रॉप्स, लाईटिंग आणि थीमच्या सहाय्याने हे शूट अधिक आकर्षक बनवले जात आहे.
फोटोग्राफी क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अनेक तरुण या क्षेत्रात करिअर म्हणून प्रवेश करत असून, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, एडिटर, ड्रोन ऑपरेटर अशा विविध स्वरूपात रोजगार निर्माण होत आहे. या सर्व प्रकारच्या शूटिंगसाठी काही हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत पॅकेजेस उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमाइज पॅकेजेसही दिली जातात. त्यामुळे या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असून, फोटोग्राफी क्षेत्र पुन्हा एकदा तेजीत आले आहे.

लोकेशनवरील इतर व्यवसायाला बहर
शूटिंग लोकेशनवरील इतर व्यवसायालाही फोटोसेशनमुळे बहर आल्याचे चित्र आहे. तेथील हॉटेल्स, फूलविक्रेते, बोटिंग या व्यवसायालादेखील फायदा होत आहे. प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या कपल आजूबाजूच्या परिसराची सैर करण्यात येत असल्याने इतर शूटिंग लोकेशनजवळील इतर व्यवसायांनादेखील चांगलाच बहर येत आहे.

मोबाइलमध्ये कॅमेरा असला तरी ओरिजन कॅमेर्‍यात जे टिपले जाते, त्यात वेगळेपण असते. प्री-वेडिंग शूटला तरुणाईची चांगलीच पसंती मिळत आहे. पारंपरिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून प्री-वेडिंग करण्याचा सध्या जास्त ट्रेन्ड आहे. नाशिक शहरात शूटसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतून तरुणाई येत आहे. त्यांची पसंती गोदाघाटावर शूट करण्यास असते.त्यातून नाशिकच्या धार्मिकनगरीचे दर्शन घडत आहे. शूटिंगचे पॅकेज पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत आहे. त्यामुळे व्यवसायाला चालना मिळत आहे.
– रोहित बोंद्रे (बोंद्रे ब्रदर्स फोटोग्राफी)

फोटोग्राफी क्षेत्रातील वाढते ट्रेंड
प्री-वेडिंग फोटो व व्हिडिओ शूट, मॅटर्निटी शूट,
बेबी बॉर्न शूट,
सिनेमॅटिक वेडिंग फिल्म
ड्रोन व एरियल शूटिंग,
थीम बेस्ड शूट,
सोशल मीडियासाठी क्रिएटिव्ह कंटेंट.

Pre-wedding ‘click’ for photography business

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *