नाशिकरोडला ‘महाबोधी महाविहार’ प्रतिकृतीचे आज लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

नाशिक : प्रतिनिधी
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नाशिकरोड शहरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीचे लोकार्पण महात्मा जोेतिबा
फुले यांच्या जयंतीनिमित्त आज करण्यात येणार आहे. यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती अध्यक्ष आकाश भालेराव व कार्याध्यक्ष गौरव काळे यांनी दिली.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नाशिकरोड शहर निळेमय झाले असून, सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवताली महाबोधी महाविहाराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता जयंती समितीचे अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून, यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 14 एप्रिल रोजी सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि 101 तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे.
उत्सवानिमित्त पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रा. अविनाश नाईक यांचा ‘यशोगाथा महासूर्याची’ हा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. 16 एप्रिल रोजी महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. 17 एप्रिल रोजी प्रख्यात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा ‘नृत्य बहार’ कार्यक्रम सादर होणार असून, 18 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महागायक मिलिंद शिंदे यांचा भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जयंती उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी निळ्या पताका व घरोघरी निळे झेंडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने नटला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस शुभम पगारे, सहचिटणीस शिरीष कांबळे, कैलास वानखेडे, अशोक खैरनार यांच्यासह मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, सनी वाघ, पवन पवार, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, समीर शेख, दिनेश दासवानी, संतोष कांबळे, राजाभाऊ वानखेडे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

‘Mahabodhi Mahavihar’ replica to be unveiled on Nashik Road today

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *