लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयीन कोठडी
सातपूर/सिडको : प्रतिनिधी
सातपूर परिसरातील लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित रवींद्र नारायण एरंडे (वय 63, रा. नीलकंठेश्वरनगर, अशोकनगर, सातपूर) याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, एरंडे याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदिवासी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नऊ जणांची तब्बल 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, एरंडे याने नोकरीचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार असून, संबंधित महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.
या तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून शंभरहून अधिक महिलांशी संबंधित व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह व डीव्हीआर जप्त केल्याची माहिती दिली आहे. आणखी आठ महिलांची ओळख पटली असून, अधिक पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एरंडे हा स्वतःला पत्रकार व सल्लागार म्हणून ओळख करून देत सातपूर परिसरात कार्यरत होता. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी एरंडे याच्या कार्यालयाची झडती घेतली असता काही आक्षेपार्ह कागदपत्रे, महिलांचे व्हिडिओ तसेच सापाची कात, कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्या. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक गंभीर होत आहे. एरंडे याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.
New crime of cheating unemployed people on castor oil