शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या
नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त शुक्रवारी समाजमाध्यमावर येेताच नाशिकसह सर्वत्र खळबळ उडाली. या खासदारांत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांच्याही नावाची चर्चा रंगली. दरम्यान, खा. वाजे यांनी ही बातमी फेटाळून लावत आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्टीकरण दिले.
गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेना उबाठाचे खासदार गळाला लावण्यासाठी ’ऑपरेशन टायगर’ राबवत असल्याची चर्चा वारंवार होत असते. दरम्यान, शुक्रवारी (दि. 10) सकाळी काही माध्यमांनी शिंदेसेनेसोबत उबाठाच्या खासदारांची बुधवारी रात्री उशिरा बैठक झाल्याचे सांगितले. अशा प्रकारचे वृत्त प्रसारित होताच खा. वाजे यांनी व्हिडिओद्वारे हा दावा त्यांनी खोडून काढत आपण कुठेही जात नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले.
खा. वाजे यांनी यापूर्वीदेखील शिंदेसेनेत प्रवेशाच्या
चर्चेचे खंडन केले आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे वृत्त शुक्रवारी आल्याने नाशिकमधील शिवसैनिकांमध्ये यावरून चर्चा रंगताना दिसली. अनेकांनी हा काय प्रकार आहे, असा प्रश्न कार्यकर्ते पदाधिकार्यांना विचारत होते.
मी आजही व उद्याही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. दुसरीकडे कुठेही जाण्याचा प्रश्न येत नाही. – खा. राजाभाऊ वाजे, नाशिक लोकसभा
I am with Uddhav Thackeray: Kha. Rajabhau Waje