लष्कराचे सामान जळून खाक; ट्रक पेटला की पेटवला संशयाचा धूर
येवला : प्रतिनिधी
येवला-कोपरगाव राज्य महामार्गावर येवला शहरातील पिपळगाव शिवारातील टोलनाक्यावर लष्कराचे सामान घेऊन जाणार्या आयशर ट्रकला भीषण आग लागून ट्रकचे मोठे नुकसान होऊन यातील सामान जळून खाक झाले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. ट्रक आणि ट्रकमधील सामान जळून खाक झाले. मात्र, कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या टोलनाका परिसरात असलेल्या वाहतूक पोलिसांनी हुज्जत घातली आणि ट्रक पेटला, असा आरोप संबंधित ट्रकचालक जगतार सिंग (रा. पंजाब) यांनी केला आहे. हा आयशर ट्रक हा पुण्यावरून येवलामार्गे पुढे चालला होता.
पिंपळगाव टोलनाक्याजवळ पोलिसांनी त्यांना नो एन्ट्रीचे कारण सांगून अडवले. यावेळी 30 हजार रुपयांचे अधिकृत चलन किंवा 5 हजार रुपयांची मागणी झाल्याचा दावा चालकाने केला आहे. चालकाने लाच देण्यास नकार दिल्याने पोलीस आणि चालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादावादीदरम्यान एका पोलीस कर्मचार्याने ओढत असलेली सिगारेट ट्रकच्या दिशेने
फेकली. ट्रकमध्ये एसी गॅसचे सिलिंडर (बाटल्या) असल्याने त्या ठिणगीमुळे भीषण स्फोट झाला. आगीचे गोळे आणि गॅसच्या बाटल्या हवेत उडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
येवला नगरपालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पोलिसांच्या या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
‘The Burning Truck’ near Yeola toll plaza