त्र्यंबकेश्वर मंदिरात पेडदर्शनाचा पर्दाफाश

दर्शनासाठी तीन हजार रुपये घेणारा भामटा गजाआड

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शनाच्या नावाने पैसे उकळणार्‍या दोघा संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनंता सुरेश मेहंदळे (वय 46, रा. पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात थेट दर्शन घडवण्यासाठी गोटीराम मनाजी पेहरो (रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) आणि अभिषेक कडलग (रा. त्र्यंबकेश्वर) या दोन संशयितांनी रोख तीन हजार रुपये घेतले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिलला फिर्यादी नाशिक येथील भाविक अनंता मेहंदळे आणि त्यांचे मित्र राकेश वाघ देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी 200 रुपये दराचे देणगी दर्शन पास घेतले आणि ते रांगेत उभे राहिले. त्यांना येथील संशयिताने भेटून मी तुम्हाला दहा मिनिटांत दर्शन करून देतो. तुम्ही घेतलेले पास दर्शनाकरिता चार ते पाच तास वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपयांत व्हीआयपी दर्शन करून देतो, असे सांगून सदर संशयिताने त्याच्या साथीदारासह भाविकांना मंदिराच्या आत प्रवेश देऊन दर्शन करून मंदिराबाहेर येताच त्यांच्याकडून व्हीआयपी दर्शनाचे तीन हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत शुल्क आकारण्याबाबत सुविधा नसताना तसेच त्याबाबत भाविकांना कोणतीही पावती न देता त्यांची फसवणूक केली. संशयित गोटीराम पेहरे, अभिषेक कडलग यांच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील गोटीराम पेहरे याला अटक केली, तर दुसरा संशयित अभिषेक कडलग फरार झाला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित तपास करीत आहेत.

पैसे घेणारे मंदिरात जातात कसे?

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाच्या नावाने पैसे घेण्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकाराने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची प्रतिमा मलिन होत आहे. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राबाबत भाविकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचत आहे. वास्तविक पाहता, त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी जाताना दरवाजावर असलेले सुरक्षारक्षक ओळखीच्या माणसासह भाविकांना थेट प्रवेश देत नाहीत. यासाठी विश्वस्तांना फोनवर विचारणा करून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर तेथील कार्यालयात नोंद केली जाते. या नोंदीमध्ये भाविकाचे नाव आणि मोबाइल क्रमांक, तसेच कोणाच्या सांगण्यावरून सोडण्यात आले, सोबत कोण आहेत, किती भाविक आहेत आणि वेळ लिहावी लागते. अशी सर्व काटेकोर व्यवस्था असताना पैसे घेऊन सोडणारे मंदिरात कसे पोहोचतात, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Peddarshan exposed in Trimbakeshwar temple

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *