डीजे सिस्टिमच्या दुकानाला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी शिवारातील ज्ञानेश्वरनगर परिसरात एका डीजे सिस्टिमच्या दुकानाला भीषण आग लागली. ही आग ज्योती पाटील व गोकुळ यशवंत पाटील यांच्या मालकीच्या दुकान व गोडावूनमध्ये लागली होती.
या घटनेची माहिती मिळताच नाशिक महापालिका सिडको अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख हर्षल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली के. के. पवार, प्रमोद लहामगे, सुनील कुगे, यश वजरे आणि सुमित काठे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
दुकानमालक गोकुळ पाटील यांनी सांगितले की, सकाळी वीज गेल्यानंतर पुन्हा आल्यावर मेन बोर्डमधून स्पार्क झाला. त्यानंतर साउंड सिस्टिम, वायर केबल्स व इतर महागडे साहित्याने पेट घेतला.
या आगीत सुमारे 30 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 31 मध्ये वीज वितरणाचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप केला आहे. वारंवार होणार्‍या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. महावितरण कंपनीविरुद्ध कारवाई करून पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाथर्डी फाटा परिसरात विद्युत केबलमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गोडावूनच्या जवळच असलेल्या आव्हाड पेट्रालपंपाच्या कर्मचार्‍यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. राजेश डोंगरे, कैलास खाडे, मंगेश नागरे व उत्तम उघडे यांनी पंपाजवळील सीओटू सिलिंडर घटनास्थळी नेले.
पेट्रोलपंपावरील महिला कर्मचारी अनिता पिंगळे व अन्नपूर्णा मोरे यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण दिलेले असल्याने त्यांनी सिलिंडर वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्राथमिक प्रयत्न केला.

Massive fire breaks out at DJ system shop

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *