प्रशासकीय राजवटीतल्या कामांचा लेखाजोखा
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेत चार वर्षे असलेल्या प्रशासकीय राजवटीत अनागोंदी होऊन गैरमार्गाने कोट्यवधींची कामे अधिकार्यांनी मार्गी लावल्याचा संशय लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे चार वषार्ंतल्या कामकाजाचा लेखाजोखा प्रशासनाने महासभेत ठेवण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली होती. महापौर हिमगौरी आडके यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चार वर्षांच्या कामाचा हिशोब ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी
महापालिकेच्या सर्व विभागांना नुकतेच पत्र धाडत लवकरात लवकर चार वर्षांतली माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महासभेत भाजप, दोन्ही शिवसेनेने चार वर्षांतल्या कामांचा लेखाजोखा सभागृहाला देण्याची मागणी केली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली 18 मार्चला झालेल्या महासभेत प्रशासकीय काळातील कामांचा हिशेब सादर करण्याचा मुद्दा चांगला गाजला होता. आयुक्तांनी माहिती देण्याचे फर्मान काढल्यानंतर अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, श्वेतपत्रिका तयार झाल्यानंतर ती महासभेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय काळातील कामकाज, खर्च व निर्णयप्रक्रियेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौरांच्या
निर्देशानंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांसमोर महापालिकेच्या चार वर्षांच्या कारभाराचा सविस्तर लेखाजोखा मांडला जाणार आहे. प्रत्येक विभागाने विकासकामांचा तपशील, खर्च, प्रलंबित व अपूर्ण प्रकल्प, निविदा प्रक्रिया, कंत्राटांची माहिती, आर्थिक व्यवहारांचा अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांची माहिती स्वतंत्रपणे सादर करण्याचे
निर्देशही देण्यात आल्याचे समजते.
Commissioner’s letter to department heads for white paper