पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4 बाहेर, चेंबर क्र. 63 जवळ बुधवारी दुपारी एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. त्यातून तो बचावल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय अंदाजे 35, रा. कात्रज) हा गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी आम्ही कात्रजचे भाई… अशी घोषणाबाजी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मंदार किवळे न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात आला होता. त्याच्या खटल्याची तारीख 25 नोव्हेंबर होती, अशी माहिती कोर्ट रेकॉर्डच्या आधारे समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन दुचाकींवरून 4 ते 7 हल्लेखोर आले होते. हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टरांच्या मतानुसार गोळी लागल्याची जखम आढळली नाही. गोळीबार झाला की पिस्तूल चालले नाही, याबाबत अजून नेमकी माहिती समोर आलेली नाही.
हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले आणि एक मॅगझिन जप्त केल्याची माहिती आहे. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Attempted brutal murder of an accused in a homicide case