कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

कळवण : प्रतिनिधी
प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही तासांत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात ठिय्या देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदनानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.
तताणी (ता. बागलाण) येथील संगीता तात्या पवार (वय 31) यांना प्रसूतीसाठी गुरुवारी (दि. 16) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास सिझरिंग करण्यात आले. नवजात बालक सुखरूप असताना शुक्रवारी (दि.17) सकाळी नऊच्या सुमारास मातेला अस्वस्थ वाटत असल्याने संबंधित डॉक्टरांनी पेशंटला अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवावे लागेल, असे सांगितले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित अधिकारी – कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंट जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
मातेचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या दिला. पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी नातलगांच्या भावना समजून घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नातलगांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातलगांनी केली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रुग्ण कल्याण समिती शोभेचे बाहुले

कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत मातेचा मृत्यू होऊन पाच तास झाल्यानंतरही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नव्हते. येथील बहुतांश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासी राहण्याचा भत्ता पगारातील घसघशीत वाढ घेतात. मात्र, रुग्णालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत, त्याचा हकनाक त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोगावा लागतो. अधीक्षकच वेळेवर उपस्थित राहत नाहीत, त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक नाही. त्यामुळे कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. या सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणजे रुग्णालय कल्याण समितीही बघ्याची भूमिकाच घेणारी
ठरत आहे.

Meeting today for ‘zero tolerance’ on violence against women

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *