कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार
नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध धंद्यांवर कारवाई झाल्याने शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याचवेळी ऑनलाइन रोलेट-बिंगो या डिजिटल जुगाराचा फैलाव वाढत असल्याची बाब समोर येत आहे.
नाशिक शहरासह सिडको, सातपूर आणि इंदिरानगर परिसरात मोबाईलच्या माध्यमातून हा जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. एजंटमार्फत ऑनलाइन आयडी देऊन काही क्षणांतच मोठ्या रकमेचे व्यवहार होत आहेत. झटपट पैसे मिळविण्याच्या मोहात अनेक युवक या खेळाकडे आकर्षित होत आहे.
त्यातून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही जण कर्जाच्या विळख्यात अडकले असून, या व्यसनामुळे टोकाचे निर्णय घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
शहरातील बार, मटका आणि इतर पारंपरिक जुगारांवर पोलिसांनी कारवाई करत आळा घातला असताना ऑनलाइन रोलेट मात्र निर्बंधांच्या कक्षेबाहेर राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या प्रकारामागे काहींचे संरक्षण आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल जुगाराविरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरलेल्या पोलिसांनी आता या ऑनलाइन रोलेटच्या जाळ्यावरही प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन गेमवर नियंत्रणाचा प्रश्न अधिवेशनात

विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाइन गेमच्या वाढत्या व्यसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या गेममुळे अनेक युवक आर्थिक अडचणीत सापडत असून काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याचेही निदर्शनास आणण्यात आले. ड्रीम 11सारख्या काही ऑनलाइन गेममधून शासनाला महसूल मिळत असल्याने त्यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. मात्र मोबाईलवर सुरू असलेला रोलेट गेम अद्यापही बिनधास्तपणे सुरू असून, त्यातून शासनाला कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे या प्रकारावर बंदी घालण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

The thrill of online roulette in the citadel of law

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *