भोंदूबाबावर गुन्हा दाखल
निफाड /लासलगाव : वार्ताहर
घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय अंदाजे 31, रा. धारणगाव खडक) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला (वय 28, व्यवसाय खासगी सुरक्षारक्षक, रा. उत्तमनगर, नाशिक) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे दोन विवाह अपयशी ठरल्याने आणि मुलगी तिच्यासोबत नसल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या परिस्थितीत तिच्या आई – वडिलांनी तिला धारणगाव (खडक) येथील तथाकथित प्रतिगाणगापूर मठात नेले. तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी काढण्याचे काम करीत असल्याचा आभास निर्माण करत होता.
दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिला आई – वडिलांसह मठात गेली असता, काकडे याने तिच्या अंगात करणीबाधा असल्याचे सांगून तिला विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. पुढे त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेत सतत वैयक्तिक आणि अश्लील आशयाचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी पंचवटी परिसरात भेटीस बोलावून काकडे याने पीडितेला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. भीती दाखवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले. तसेच तिचे फोटो काढून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात होती. कुटुंबीयांच्या भीतीमुळे आणि आरोपीच्या प्रभावामुळे तिने तक्रार देण्याचे टाळले. दरम्यान, आरोपीने तिचे मोबाइलमधील पुरावेही जबरदस्तीने डिलीट केल्याचे समोर आले आहे. नंतर पीडितेचे लग्न झाले. या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार दिली नाही. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर तिने अखेर पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल वर्दे आणि अॅड. स्वाती तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिला व तिच्या पतीने लासलगाव पोलीस ठाणे गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनेची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sexual abuse of a woman in the name of divine power