मनपाचे अंदाजपत्रक साडेतीन हजार कोटींच्या घरात

स्थायीनंतर महासभेची दीडशे कोटींची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 457 कोटी वाढवल्यानंतर आता महासभेनेदेखील दीडशे कोटींची वाढ अंदाजपत्रकात केली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक साडेतीन हजार कोटींच्या घरात गेले आहे.
आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीकडे 3011.85 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायी समितीने तब्बल 457 कोटी 28 लाखांची वाढ केली. तर महासभेनेदेखील एक पाऊल पुढे टाकत दीडशे कोटींची वाढ सुचविली आहे. यामुळे मनपाचे अंदाजपत्रक जवळपास 3600 कोटींपर्यंत गेले आहे. स्थायी समितीने गेल्या 30 मार्चला महासभेकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकात प्रभाग विकास निधीमध्ये तब्बल 275 कोटींची वाढ केल्याने आता प्रभाग विकास निधी 314 कोटींचा झाला आहे. तर दुसरीकडे महासभेनेदेखील प्रभागांमधील विकासकामांसाठी प्रशासनाला निधी सुचविला आहे. सभापती सानप यांनी सादर केलेले अंदाजपत्रक महापौर हिमगौरी आडके यांनी दुरुस्तीसह मंजूर करत प्रशासनाला विविध उपाययोजना करून महसूल वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रभाग विकास निधीसाठी पुरेशी तरतूद करण्याबाबत नगरसेवकांनी भूमिका घेतली होती. त्यानुसार सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रभाग विकास निधी 39 कोटींवरून 314 कोटी इतका केला आहे. यामुळे नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील विकासकामे काही अंशी का होईना परंतु मार्गी लावता येणार आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होती. या कालावधीत शहरातील नागरी विकासकामे पुरेशा प्रमाणात होऊ शकली नाहीत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज या मूलभूत गरजांसह ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी नगरसेवकांनी प्रभाग विकास निधीबाबत महासभा आणि स्थायी समितीच्या सभेत मागणी केली होती.

अंदाजपत्रकाची आकडेवारी
प्रशासनाचे अंदाजपत्रक 3011.85 कोटी
स्थायी समितीची वाढ 457
महासभेकडून वाढीची शक्यता 198
एकूण सधारित अंदाजपत्रक 3666.87 कोटी

Municipal Corporation’s budget is around 3,500 crores.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *