स्फोटानंतर आग, मोठी जीवितहानी टळली
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील वडगाव-कुसुंबा मार्गावरील वडगाव बसस्थानकाजवळ बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्वालाग्रही रसायनामुळे झालेल्या स्फोटानंतर दोन्ही ट्रक काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले. मात्र, पोलीस पाटील, ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक जीजे-16 एव्ही-7191 आणि एमएच-20 ईजी-4028 यांची वडगाव बसस्थानकाजवळ समोरासमोर धडक झाली. एका ट्रकमध्ये साड्यांचा माल व ज्वलनशील केमिकल होते, तर दुसर्या ट्रकमध्ये अॅसिड पावडरच्या गोण्या होत्या. धडकेनंतर झालेल्या स्फोटामुळे काही क्षणांतच दोन्ही ट्रकना आग लागली. आगीचे लोळ तब्बल 40 ते 50 फूट उंच उसळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वडगावचे पोलीसपाटील खुशालचंद शिंदे यांनी तत्काळ वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 बंबांसह जवान घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
दरम्यान, एका ट्रकमधील चालक आगीत अडकून पडला होता. आग नियंत्रणात आल्यानंतर क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. जखमी चालकास तातडीने उपचारासाठी प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच या दुर्घटनेत दादाजी वाघ (वय 52) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आगीच्या झळा जवळील दोन सलून दुकाने व एका घरापर्यंत पोहोचल्याने त्यांचेही नुकसान झाले. या घटनेमुळे सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, वडगाव परिसरातील गतिरोधकांच्या प्रश्नाकडे या अपघातानंतर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. “आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास
सुरू आहे.
Fatal truck accident near Vadgaon in the early morning