महापालिका, पोलिसांचेही दुर्लक्ष; वाहनांच्या लागतात रांगा
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत दररोज अतिक्रमण निर्मूलन मोहीम महापालिकेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होत आहेत. महापालिकेच्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असताना एबीबी सर्कलजवळील आइस्क्रीम विक्रीच्या हातगाडीमुळे एबीबी सर्कलवर दररोज सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
आइस्क्रीम खाण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यातच वाहने उभी करत आहेत. निम्मा रस्ता वाहनांनी व्यापला जात आहे. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि गंगापूर पोलिस याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या आइस्क्रीम विक्रेत्याला नेमके कुणाचे अभय आहे? याकडे आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एबीबी सर्कलजवळ दररोज सायंकाळी खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. त्यात आइस्क्रीम विक्रेत्याच्या हातगाड्यावरच सर्वाधिक गर्दी असते. शहरातील इतर दुकाने दहाच्या आत बंद होतात; परंतु ही आइस्क्रीमची विक्री रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते. विशेष म्हणजे, पोलिस व्हॅन सायरन वाजवत येते. काही वेळ थांबते. या व्हॅनमधील कर्मचार्यांनाही आइस्क्रीमचा स्वाद दिला जातो. त्यामुळे तेदेखील शांततेत निघून जातात. मात्र, याचा त्रास या मार्गावरील वाहनधारकांना सहन करावा लागतो. याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. सध्या त्र्यंबकरोडचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गातूनच दुहेरी वाहतूक केली जात आहे. त्यात आइस्क्रीम खाण्यासाठी थांबणारे रस्त्यात वाहने, कार पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडते. याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात. मात्र, महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका शहरभर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत असताना या ठिकाणी मोहीम न राबविण्यामागचे नेमके कारण काय आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळच हे सारे अतिक्रमण आहे. विशेष म्हणजे, सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता आधीच अरुंद झाला असताना या ठिकाणाहून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागते. यापूर्वी याच ठिकाणी गर्दीमुळे अपघात होऊन एका मुलीला प्राणही गमवावे लागलेले आहेत. तरीही महापालिका एबीबी सर्कलजळील विक्रेत्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याने आता पोलिसांनीच कायद्याचा दंडुका उगारण्याची गरज आहे.
Traffic jam due to Khaugalli near Mahatmanagar