चाकूबाज राजेंद्र काकवीपुरे इंदूरमध्ये जेरबंद

पंचवटी : प्रतिनिधी
आडगाव नाका परिसरात जुन्या वादातून मित्रासमोरच तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करणार्‍या सराईत गुन्हेगाराला आडगाव पोलिसांनी तब्बल 600 किलोमीटरचा थरारक पाठलाग करून इंदूर (मध्य प्रदेश) येथून बेड्या ठोकल्या आहेत. खुनानंतर आरोपी थेट उज्जैनला महाकाल दर्शनासाठी गेला होता, मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सिल्वर मॉल परिसरातून ताब्यात घेतले.
9 मे रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास आडगाव नाका येथील मधुर मिलन स्वीट्ससमोर ही रक्ताळलेली घटना घडली होती. जयवंत यशवंत पवार हे त्यांचा मित्र विनोद आगळे याच्यासोबत उभे असताना, आरोपी राजेंद्र विठोबा काकवीपुरे (रा. येवला, ह.मु. के.के. वाघ कॉलेजमागे) याने जुन्या वादाची कुरापत काढली.
रागाच्या भरात राजेंद्रने आपल्याकडील धारदार चाकूने जयवंत यांच्या बगलेखाली छातीवर गंभीर वार केले. या हल्ल्यात जयवंत यांचा मृत्यू झाला, तर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता.
या पथकाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या पथकात सपोनि निखिल बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख, हवालदार दादासाहेब वाघ, इमरान शेख, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आदींचा समावेश होता. इंदूर क्राइम ब्रँचच्या अमित कटियार व त्यांच्या टीमने या कारवाईत मोलाचे सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे करत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.

येवला ते इंदूर… असा झाला पाठलाग

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक आरोपीच्या मागावर होते. आरोपी येवल्यातील मित्राच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळाली. येवला आणि मनमाडजवळील नागापूर येथे नातेवाइकांकडे चौकशी केली असता, आरोपी डोंबिवलीत असल्याची माहिती मिळाली. पथक तातडीने तिकडे रवाना झाले. डोंबिवलीत पोहोचल्यावर समजले की, आरोपी उज्जैनला दर्शनासाठी गेला आहे. पोलिसांनी तातडीने मध्य प्रदेशची वाट धरली. आरोपी उज्जैनहून इंदूरकडे येत असल्याचे समजताच, वेळ न घालवता आडगाव पोलिसांनी इंदूर क्राइम ब्रँचशी संपर्क साधला. इंदूरमधील सिल्वर मॉलजवळ दोन्ही पथकांनी सापळा रचून राजेंद्र काकवीपुरे याला शिताफीने अटक केली.

Knife-wielding Rajendra Kakvipure arrested in Indore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *