नाशिकचे अनेक मोठे क्लास आता सीबीआयच्या रडारवर

’नीट’ पेपरफुटीप्रकरणी तपासाला वेग

नवी दिल्ली :
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणार्‍या नीट पेपरफुटी प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर
येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे एक विशेष पथक सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणातील बारकावे तपासत आहे. नीट पेपरफुटी प्रक्रियेत टेलिग्राम या सोशल मीडिया माध्यमाचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे सीबीआय आता पुढील तपास करत आहे. तसेच, शुभम खैरनार राहत असलेल्या आणि त्याच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स सीबीआयकडून बघीतले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत शुभमच्या संपर्कात कोण-कोण आले? त्याने कोणाशी दूरध्वनीवरून किंवा सोशल मीडियावरून संशयास्पद संवाद साधला? याचा सखोल मागोवा घेतला जात आहे.

लातूरला खासगी क्लास चालकाच्या घरी तपासणी

दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये कारवाईला सुरुवात झाली होती. त्यानंतर रविवारी दिवसभर सूत मिल परिसरातील एका खासगी ट्यूशन चालकाच्या घरी तब्बल अकरा तास तपासणी केल्यानंतर आता त्याच ट्यूशन संचालकाच्या कार्यालयातही सीबीआयचे पथक तपास करत आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई अधिक महत्त्वाची मानली जात आहे. शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी संबंधित ट्यूशन चालकाच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

वैद्यकीय प्रवेशाचे रॅकेट उघडकीस?

शुभम खैरनारच्या अटकेनंतर त्याच्या जवळच्या मित्रांची आणि इतर संबंधितांची कसून चौकशी केली जात असून त्यांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत शुभमने यापूर्वी काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे नाशिकमधील काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक देखील आता सीबीआयच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या चौकशीतून आणखी काही मोठे पुरावे आणि नाशिकमधील इतर संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Many big classes of Nashik are now on the CBI’s radar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *