दरीआई माता वनक्षेत्रात पुन्हा वणवा

शेकडो हेक्टर जंगल भस्मसात

पंचवटी : प्रतिनिधी
दरीआई माता वनक्षेत्रात शनिवारी सायंकाळी 4.45 वाजता अज्ञात समाजकंटकाने लावलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले. हजारो झाडे, वन्यजीव, पक्षी, विशेषतः शेकडो मोर आणि संपूर्ण जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. दरीआई माता वनक्षेत्रातील आग विझवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जीव धोक्यात घालून आटोकाट प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. दरम्यान, यावेळी आग लावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दरीआई माता वृक्षमित्र परिवाराने केली आहे.
दरीआई माता वनक्षेत्रात आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच शिवकार्य संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, दरीआई माता वृक्षमित्र परिवाराचे भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. राह फाउंडेशनच्या टीमनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. गवळवाडी येथील आकाश तांदळे, सनी मोंढे, नंदू चारस्कर, योगेश चारस्कर यांनीही मदतकार्यात परिश्रम घेतले. या वणव्यात दरीआई देवीच्या वरील पश्चिम वनक्षेत्र, मायना डोंगराच्या दक्षिण पायथ्याचा परिसर, तसेच शेकडो एकर गवताळ रान पूर्णपणे जळून गेले. अनेक उभी झाडेही आगीत भस्मसात झाली आहेत.

दरवर्षीचीच मालिका, यावेळचा सहावा वणवा
स्थानिकांनी सांगितल्यानुसार या भागात दरवर्षी वणव्याची मालिका सुरूच असते. यावर्षी लागलेला हा सहावा वणवा आहे. वारंवार आग लावणार्‍या समाजकंटकांमुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
होत आहे.

प्रशासनाने दखल घेत कठोर कारवाई करावी
या घटनेचा तालुका पोलीस स्टेशन, स्थानिक ग्रामपंचायत आणि वनविभागाने तातडीने स्थळपाहणी करून पंचनामा करावा, तसेच वणवा लावणार्‍या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दरीआई माता वृक्षमित्र परिवार व शिवकार्य संवर्धन संस्था व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Wildfires again in the Darai Mata forest area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *