कुंभमेळा लोगोबाबत भाविकांत समाधान

शासनाने स्पर्धात्मक पद्धतीने निवड केलेले बोधचिन्ह योग्य असल्याचा निर्वाळा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे बोधचिन्ह शासनाने प्रसिद्ध केले आहे. या चिन्हावर आता वाद -प्रतिवाद सुरू झाले आहेत. या बोधचिन्हात नाशिकची ओळख दिसत नसल्याचा दावा नाशिकच्या संत-महंतांनी केला आहे, तर शासनाने स्पर्धात्मक पद्धतीने निवड केलेले बोधचिन्ह योग्य असल्याचे व त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप केलेला नसल्याने बोधचिन्हाबाबत वाद निर्माण होऊ नये, असे मत व्यक्त होत आहे. या बोधचिन्हाबाबत भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्यात त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे कुंभमेळा होतो. उत्तराखंडातील हरिद्वार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथे होणार्‍या कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव साधू पूर्वपरंपरेने एकाच घाटावर ठरलेल्या वेळेत स्नान करतात. मात्र, महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव साधू त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त घाटावर, तर वैष्णव साधू नाशिक येथे रामघाटावर स्नान करतात. देव-दानवांच्या समुद्रमंथनात प्राप्त झालेल्या अमृताचे थेंब गोदावरीत पडले, अशी मान्यता आहे. गोदावरीच्या कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व ते प्राचीन स्थान आहे. तथापि, शैव-वैष्णवांचा वाद झाला म्हणून सन 1760 मध्ये तत्कालीन पेशवे सरकराने कुशावर्त घाटावर शैव साधू स्नान करतील आणि नाशिकच्या रामघाटावर वैष्णव साधू स्नान करतील, असा निवाडा केला. आजही त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर सात नागा आखाड्यांचे साधू प्रथम स्नान करतात. सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत कुशावर्तावर वैष्णव साधूंच्या स्नानासाठी वेळ राखीव आहे. या वेळेत कोणताही आखाडा अथवा भक्त स्नान करत नाहीत. त्र्यंबकेश्वर येथील उदासीन आणि निर्मळ आखाड्याचे स्नान त्यानंतर होत असते. वेळेची अशी व्यवस्था पेशवे सरकारनंतर ब्रिटिश शासनाने गॅझेटमध्ये नोंदवली आहे. त्र्यंबकेश्वर येथे 10 शैव साधूंचे आखाडे स्नान करतात, तर नाशिक येथे 3 वैष्णव साधूंचे आखाडे स्नान करतात.
बोधचिन्हावर नाशिकची ओळख होत नसेल तर त्यामध्ये किरकोळ बदल करण्यास हरकत नाही, असे बहुतांश भक्तांचे म्हणणे आहे. तथापि त्रिशूल, मंदिर आणि ध्वज यामुळे बोधचिन्ह अधिक समर्पक झाले आहे. हिंदूंचा महाउत्सव असलेला महाकुंभमेळा त्रिशूळ असल्याने अधिक प्रभावीपणे जगभर पोहोचेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, असा वाद यापूर्वी वेळोवेळी प्रत्येक सिंहस्थाच्या नियोजनात झाला आहे. त्यामधून समन्वय काढताना त्र्यंबकेश्वर-नाशिक असा कुंभमेळा असा उल्लेख करावा, असा आग्रह त्र्यंबकेश्वरचे साधू, ग्रामस्थांनी वेळोवेळी लावून धरला आहे. यापुढेदेखील शासन दरबारी प्रसिद्धिमाध्यमात त्र्यंबकेश्वर -नाशिक असा उल्लेख होणे
गरजेचे आहे.

बोधचिन्ह सरकारने स्पर्धात्मक पद्धतीने निवडले आहे. ते प्रसिद्ध करण्यापूर्वी दाखवून घेतले असते तर आक्षेप घेण्यास वाव मिळाला नसता. तथापि बोधचिन्ह योग्य आहे. त्यामध्ये काही किरकोळ बदल करायचे असल्यास सर्वसंमतीने होणे गरजेचे आहे.
– महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, आनंद आखाडा

त्र्यंबकेश्वर मंदिरात शिव आणि विष्णू यांची दररोज पूजा होते. बोधचिन्हाच्या माध्यमातून शैव आणि वैष्णव भेद निर्माण करणे योग्य होणार नाही. कुंभमेळा हा हिंदू धर्माचा सर्वांत मोठा उत्सव आहे. त्याचे आयोजन करताना परस्परांमध्ये भेदाभेद नको. – मनोज थेटे, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *