एफडी व्यवहारातील ‘2 टक्के’ कमिशनचा मुद्दा चर्चेत
सिन्नर : प्रतिनिधी
कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाते आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी अशोक खरात आणि संस्थापक नामकर्ण आवारे यांना सोमवारी (दि. 18) सिन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत दोघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
पतसंस्थेत 32 बनावट खाती उघडून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात आधीपासून अटकेत असलेल्या अशोक खरात याचा ताबा सिन्नर पोलिसांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून घेतला होता.
नामकर्ण आवारे यांना मुसळगाव येथील कार्यालयातून अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यानंतर सोमवारी (दि.18) त्यांना दोघांनाही एकाच पोलिस वाहनातून सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, दोघांनी एकमेकांकडे पाहणे टाळले.
दरम्यान, पतसंस्थेत एफडी करून देण्याच्या बदल्यात नामकर्ण आवारे यांना 2 टक्के रक्कम दिल्याची कबुली अशोक खरात याने दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या व्यवहारासंदर्भात अधिक तपास आवश्यक असल्याचेही पोलिसांकडून नमूद करण्यात आले.
आवारे यांच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी या दाव्यावर आक्षेप घेत कोणतेही लेखी पुरावे किंवा व्यवहाराच्या नोंदी उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच पतसंस्थेतील सर्व कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात असून संचालक मंडळालाही 179 च्या नोटिसा बजावण्यात आल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. खरात यांच्या वतीने अॅड. सचिन भाटे यांनी बाजू मांडली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांनी खरात आणि आवारे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
रजेच्या अर्जास परवानगीची मागणी
कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन असलेले आवारे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे विद्यमान चेअरमन आहेत. ते तुरुंगात असल्यामुळे चेअरमन पदावर कामकाज करणे शक्य नसल्याने त्यांच्या रजेची परवानगी मिळावी, अशी मागणी अॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयाकडे केली.
Ashok Kharat, Aware sent to 14 days judicial custody