सिन्नर पोलिसांकडून 1.87 कोटींचा गुटखा जप्त

बारागाव पिंप्री रोडवर दोन ट्रक पकडले; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार

सिन्नर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या अवैध वाहतुकीवर सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक कोटी 87 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बारागाव पिंप्री रोडवरील सांगळे फार्महाउस परिसरात रविवारी (दि.17) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दोन मालवाहू ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटखा, जर्दा व पानमसाल्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.
सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने बारागाव पिंप्री रोडवर नाकाबंदी केली असता निफाडकडून येणारा (एमएच 40- वाय 1979) क्रमांकाचा टाटा कंटेनर आणि (एमएच 40 -सीएम 6616) क्रमांकाचा अशोक लेलंड ट्रक संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. मात्र, यावेळी एका वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.
टाटा कंटेनरवरील चालकाने आपले नाव रब्बी अहमद शेख (रा. मंगरुळपीर, जि. वाशिम) असे सांगितले. पोलिसांनी दोन्ही वाहने सिन्नर पोलिस ठाण्यात आणून पंचांसमक्ष तपासणी केली असता प्रतिबंधित सुगंधित पानमसाला, जर्दा व गुटखा सदृश माल आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे, अक्षय गाडेकर व चेतन परदेशी यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता 66 लाख रुपयांचा ‘बाजीराव बीआर गोल्ड’ फ्लेवर पानमसाला, 76 लाख 56 हजार रुपयांचा ‘नजर’ पानमसाला व जर्दा, तसेच 9 लाख 90 हजार रुपयांचा ‘मस्तानी 216 प्रीमियम च्युइंग टोबॅको’ असा साठा आढळून आला. याशिवाय 20 लाख रुपयांचा टाटा कंटेनर आणि 15 लाख रुपयांचा अशोक लेलंड ट्रक असा एकूण 1 कोटी 87 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रब्बी अहमद शेख याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोउनि अंकुश वारुंगसे, हवा समाधान बोराडे, नितीन डावखर, गणेश वराडे, गवंडी तसेच पोलीस अंमलदार विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, विलास बिडगर, महेंद्र खामकर आणि तवर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे करीत आहेत.

Sinnar police seize gutkha worth Rs 1.87 crore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *