सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी कायम आहेत. पीएल ग्रुपचा म्होरक्या संशयित प्रकाश ऊर्फ बॉस लोंढे आणि दीपक ऊर्फ भाईजी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणावर नाशिक जिल्हा न्यायालयात 26 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऑरा बारमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात खंडणी, धमकी आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली. त्यात पीएल ग्रुपशी संबंधित आरोपींचाही समावेश आहे. प्रकाश ऊर्फ बॉस लोंढे हा या प्रकरणातील प्रमुख संशयित मानला जात आहे. त्याच्यावर खंडणी व गुन्हेगारी कारवायांचे आरोप आहेत.
दरम्यान, आरोपींकडून न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांवर सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपींची पार्श्वभूमी तसेच तपासाची स्थिती न्यायालयासमोर मांडल्याचे समजते. त्यामुळे न्यायालयाने तत्काळ निर्णय न देता पुढील सुनावणीसाठी 26 मेची तारीख निश्चित केली आहे.
या प्रकरणाकडे शहरासह पोलिस प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Hearing on Prakash Londhe’s bail application on 26th May