लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी
पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना घरी जाऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, त्याला गंगापूररोड भागातून ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. त्यानेही पीडितेवर अत्याचार केल्याचे उघड
झाले आहे.
पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या मर्जीविरुद्ध संशयित आरोपीने कॅफे तसेच तिच्या घरात जाऊन लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी लहु संपत खंदारे याच्यावर पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाकडून शोध सुरू असतनाच सदरचा आरोपी हा सेलू (ता. परतूर, जि. जालना) येथे पळून गेला असल्याबाबत माहिती मिळाली. परंतु, पोलीस पथकाला त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. पोलीस अंमलदार गोरख साळुंके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा आरोपी हा जालना येथून त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी डी. के. नगर, गंगापूररोड परिसरात येणार असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी केली असता, गुन्ह्यात दुसरा आरोपी आकाश संतोष कांबळे (रा. सावरकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यानेसुद्धा पीडितेला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक संबंध केले असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याच्या तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम पाटील व पोलीस पथकाने सिव्हिल हॉस्पिटल येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, गोरख साळुंके, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, सचिन रिपोटे यांनी केली आहे.

Two absconding sexual assault accused arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *