जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

टंचाईच्या अफवांमुळे गर्दी; जिल्हाधिकार्‍यांकडून संयमाचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
इंधन दरवाढ आणि संभाव्य टंचाईच्या चर्चेमुळे नाशिक जिल्ह्यात अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र बुधवारी (दि. 20) दिसले. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा पुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. यावेळी पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड तसेच विविध ऑइल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठा, वितरण व्यवस्था आणि वाढत्या मागणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीत बीपीसीएलच्या प्रतिनिधींनी रिटेल ग्राहकांसाठी 350 लिटरपर्यंत ऑटो लॉक प्रणाली लागू केल्याची माहिती दिली. यापेक्षा अधिक इंधन वितरणावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. औद्योगिक वापरासाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 40 रुपयांपर्यंत वाढ झाल्याची चर्चा बैठकीत झाली. तसेच नायरा कंपनीच्या डिझेल दरात सुमारे 6 रुपये आणि पेट्रोलमध्ये 3 रुपयांनी वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले. कुंभमेळ्याशी संबंधित कंत्राटदारांना इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी तेल कंपन्यांना दिल्या. संबंधित कंत्राटदारांची यादी कंपन्यांना देण्यात येणार असून, आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, ग्रामीण भागात किमान 80 टक्के इंधन पुरवठा कायम ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. काही कंत्राटदारांना घरपोच इंधन पुरवठा करण्याच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना घाबरून इंधन साठवणूक न करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. वितरण सुरळीत सुरू असून नागरिकांनी पॅनिक होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

16 नवीन पेट्रोल पंपांचे प्रस्ताव

जिल्ह्यात नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी 16 प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील इंधन वितरण व्यवस्था आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एमआयडीसी, रुग्णालयांना प्राधान्याने पुरवठा
जिल्हा प्रशासनाने औद्योगिक क्षेत्र, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सौरऊर्जेमुळे डिझेलवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न
डिझेलचा वाढता वापर लक्षात घेऊन काही यंत्रणांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवण्यावर प्रशासनाचा भर आहे. पर्यायी ऊर्जा वापराबाबत नियोजन सुरू करण्यात आले आहे.

Sufficient stock of petrol and diesel is available in the district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *