आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आगामी महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (मविआ) प्रमुख नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांना पूर्णविराम देत, महाविकास आघाडी आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने लढणार असल्याचा अधिकृत संदेश या पत्रकार परिषदेद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा आता पूर्णपणे सुटला आहे. जागांची संख्या निश्चित करताना केवळ पक्षाची वैयक्तिक प्रतिष्ठा न पाहता, केवळ आणि केवळ उमेदवाराची ’निवडून येण्याची क्षमता’ हाच एकमेव निकष ठरवण्यात आला आहे. काही जागांवर असलेल्या मतभेदांवर मित्रत्वाच्या वातावरणात चर्चा करून तोडगा काढण्यात आला असून, कोणत्याही मतदारसंघात मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही नेत्यांनी दिली. यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीकडून होत असलेल्या टीकेला मविआने सडेतोड उत्तर दिले आहे.
महागाई, बेरोजगारीवरून सरकारवर टीका
पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, बेरोजगारी, शेतकर्यांचे रखडलेले प्रश्न आणि महागाई या मुद्द्यांवरून नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जनतेचे हितरक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता एकत्रितपणे मैदानात उतरेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Unanimity on seat distribution in Mahavikas Aghadi