राज्यात 52 हजार कोटींचे 4 नवीन द्रुतगती महामार्ग

‘समृद्धी’शी कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासालाही मिळणार गती

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी 51,906 कोटी रुपयांच्या 4 नवीन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्गांच्या (एक्स्प्रेस-वे) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा(एमएसआरडीसी)च्या माध्यमातून हे प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या नव्या महामार्गांमध्ये प्रामुख्याने नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नवेगाव मोरे ते सुरजागड या 547 किलोमीटर लांबीच्या 4 प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
या नवीन महामार्ग जाळ्याचा थेट आणि मोठा फायदा नाशिक शहर व जिल्हा परिसराला होणार आहे. हे चारही नवीन एक्स्प्रेस-वे विदर्भातील अंतर्गत जिल्ह्यांना जोडण्यासोबतच थेट ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’ला जोडले जाणार आहेत. नाशिक हे समृद्धी महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याने, या नव्या जोडणीमुळे नाशिकहून पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या दूरच्या जिल्ह्यांमध्ये जाणे अत्यंत वेगवान होणार आहे. यामुळे नाशिककरांना विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंत थेट हायस्पीड रस्ते कनेक्टिव्हिटी मिळणार असून, प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.

नाशिकच्या विकासासाठी मैलाचा दगड
नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हा भाग खनिज संपत्तीने (विशेषतः लोहखनिज) समृद्ध असून, नवेगाव मोरे-सुरजागड कॉरिडॉर समृद्धी महामार्गाशी जोडल्यामुळे तेथील कच्चा माल थेट नाशिकच्या औद्योगिक वसाहतींपर्यंत अतिशय वेगाने पोहोचवणे शक्य होईल. याशिवाय नाशिकमधील कृषी उत्पादने, द्राक्षे आणि कांदा या नव्या महामार्गांच्या जाळ्यामुळे पूर्व भारतातील मुख्य बाजारपेठांपर्यंत अवघ्या काही तासांत पोहोचवता येतील. हा प्रकल्प 2028 पर्यंत कार्यान्वित झाल्यावर नाशिकची लॉजिस्टिक क्षमता आणि कनेक्टिव्हिटी एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

प्रकल्प किंमत व मुदत : एकूण 51,906 कोटी रुपयांचा निधी मंजूर; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

नाशिकला थेट फायदा : सर्व 4 नवीन महामार्ग थेट ‘समृद्धी महामार्गा’ला जोडले जाणार असल्याने नाशिकहून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाचा प्रवास विनाअडथळा व सुसाट होईल.

4 नवीन मंजूर मार्ग : नागपूर-चंद्रपूर (204.79 किमी), नागपूर-गोंदिया (162.37 किमी), भंडारा-गडचिरोली (94.24 किमी) आणि नवेगाव मोरे ते सुरजागड (85.76 किमी).

औद्योगिक व कृषी क्षेत्राला गती : गडचिरोलीतील खनिज वाहतूक आणि नाशिकमधील कृषी व औद्योगिक उत्पादनांच्या मालवाहतुकीला मोठी गती मिळणार.

 

4 new expressways worth Rs 52,000 crore in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *