सिन्नर : प्रतिनिधी
जुन्या सिन्नर-पुणे मार्गावरील मनेगाव फाटा परिसरात गुरुवारी पहाटे भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. स्पीडब्रेकरवर अचानक ब्रेक दाबल्याने कारवरील नियंत्रण सुटून वाहनाने संरक्षण कठडे, शेडचे पोल तोडत थेट देव नदीलगतच्या खोल नाल्यात उलटली. या अपघातात गोंदे येथील रामदास मारुती जायभाये ( 46) यांचा मृत्यू झाला, तर कारमधील एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 21) पहाटे 1.30 च्या सुमारास टोयोटा इनोव्हा (एमएच 15 केके 9506) ही कार संगमनेरकडून सिन्नरच्या दिशेने येत होती. हॉटेल रानवाराजवळील मनेगाव फाटा परिसरात चालकाने भरधाव वेगात असताना स्पीडब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून कारने प्रथम रस्त्यालगतचे संरक्षण डिव्हायडर तोडले. त्यानंतर पत्र्याच्या शेडचे लोखंडी पोल उडवत कार थेट देव नदीलगतच्या खोल नाल्यात जाऊन उलटली.
अपघात इतका भीषण होता की, चालक रामदास जायभाये यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कारमधील एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
या प्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश वराडे करीत आहेत.
Terrible accident near Manegaon; Driver killed, woman injured