तुटवड्यावरून पंपचालक-तेल कंपन्यांत आरोप-प्रत्यारोप

आरटीजीएस वेळेत : तेल कंपन्यांकडून पुरवठ्यास विलंब

नाशिक : प्रतिनिधी
पानेवाडी (मनमाड) डेपोत इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असा दावा वारंवार जिल्हा प्रशासन करीत असले, तरी जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल शिल्लक नसल्याचे फलक झळकत आहेत. इंधन तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इंधनसाठा संपल्याच्या अफवेमुळे डिझेल घेण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रांगा पाहायला मिळत आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दोन दिवसांपूर्वी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक केली. त्यानंतर लगेच शुक्रवारी (दि. 22) पेट्रोलपंप चालकांचीही बैठक घेतली. या बैठकीत वेळेत आरटीजीएस करूनही पुरवठा होत नाही, असा आरोप पंप चालकांनी केला आहे. त्यामुळे तेल कंपनी व पेट्रोलपंप चालकांच्या वादात सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या वादावर तोडगा काढून लवकरात लवकर इंधनपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. या बैठकीस नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे विजय ठाकरे, उपाध्यक्ष यांच्यासह पेट्रोलपंपचालक उपस्थित होते.
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात इंधनपुरवठा विस्कळीत झाला आहे. डिझेल-पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण न करता तेल कंपन्या व पेट्रोलपंप चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित इंधन पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. जोपर्यंत पंपचालक व तेल कंपन्या एका व्यासपीठावर येऊन मार्ग काढत नाहीत, तोपर्यंत इंधन तुटवड्याचा फटका नागरिकांनाच बसणार, हे स्पष्ट आहे.

तेल कंपन्यांचा आरोप
पंपचालक आगाऊ आरटीजीएस करत नाहीत. ऑर्डर दिल्यानंतर पैसे जमा होण्यास विलंब होतो. त्यामुळे लोडिंगला उशीर होतो आणि पुरवठा साखळी तुटते. वेळेत पेमेंट झाले तर 24 तासांत टँकर पोहोचतो.

पेट्रोलपंप चालकांचा पलटवार
आम्ही आरटीजीएस व आगाऊ पेमेंट करूनही तीन ते चार दिवसांपर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा मिळत नाही. पैसे आगाऊ जमा असतानाही टँकर वेळेत येत नसल्याने पंप ‘ड्राय’ होत आहेत. त्यामुळे तेल कंपन्याच तुटवड्याला जबाबदार आहेत, असे स्पष्टीकरण नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने शुक्रवारच्या बैठकीत दिले.

वाहनधारकांनी अफवावर विश्वास ठेवू नये 
नागरिक, शेतकरी व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन व नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
-दिनेश धात्रक, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेर
असोसिएशन

काही पेट्रोल पंपचालक पंप ड्राय झाल्यानंतर आरटीजीएस करतात. त्यामुळे टँकर येण्यास 12 ते 18 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे टँकरचे नियोजनदेखील विस्कळीत होते. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लवकरात लवकर इंधन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास पानेवाडी डेपोला भेट देऊन आढावा घेतला जाईल.
– रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक

Accusations and counter-accusations between pump operators and oil companies over shortage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *