गैरकारभारावर संताप, कार्यालयात आवश्यक आसनव्यवस्था नाही
सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सिडको प्रभागात प्रशासनाचा गैरकारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सभापती निवडून महिनाभर उलटूनही प्रभाग कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. प्रभाग समितीच्या सभागृहात सदस्यांना बसण्यासाठी आसनव्यवस्था नसल्याने मासिक सभाच रद्द करण्याची वेळ आली. नागरी समस्यांचा डोंगर वाढत असताना नागरिकांतून प्रशासनावर टीका होत आहे.
सिडको तथा नवीन नाशिकच्या सिडको प्रभागात सध्या गैरकारभाराचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि पथदिव्यांच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेली मासिक सभाच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ शकली नाही. कारण काय तर सदस्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती.
नवनिर्वाचित सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभापती दालनाची दुरवस्था समोर आली. प्रभाग समितीच्या सभापतींना भेटण्यासाठी येणार्या लोकांसाठी साधी बैठक व्यवस्थादेखील नसल्याने ‘कारभार मोठा, पण व्यवस्था तोकडी’ अशी भावना व्यक्त होत आहे.
अडगळीत पडलेल्या दालनातूनच सभापतींनी कामकाज सुरू केले. मात्रस प्रशासनाचा सुस्तपणा कायम असल्याने आठ दिवस उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
प्रभागाच्या मासिक बैठकीसाठी सभागृहाची तयारी करण्यात आली, पण तेथेही सदस्यांना बसण्यासाठी आवश्यक आसन व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रभाग समितीची मासिक बैठकदेखील होऊ शकली नाही. त्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा प्रश्न आणखी लांबणीवर पडला. सदस्यांनी वेळोवेळी बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकार्यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून सिडको प्रभागातील रखडलेली मासिक सभा तातडीने घेण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे. आवश्यक सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट करत आपले कामकाज सुरूच ठेवणार आहे
-बाळकृष्ण शिरसाठ, सभापती, सिडको प्रभाग समिती
CIDCO Ward Committee meeting postponed