अवैध खाणपट्टयाविरोधात युवकाचे टॉवरवर आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी
वडाळीभोई (ता. चांदवड) शिवारात महामार्गालगत शेतीपासून अवघ्या 100 मीटरवर 10 ते 12 अवैध खाणपट्टे-खडीक्रशर राजरोस सुरू आहेत. 2018 पासून शेतकर्‍यांचे नुकसान होत असून, वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने डोळेझाक केली. त्यामुळे मंगळवारी (दि.26) अखेर संतप्त युवक चेतन शेवाळे याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मोबाइल टॉवरवर चढून 40 मिनिटे आंदोलन केले.
शेवाळे हा अचानक टॉवरवर चढल्याने जिल्हा प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेवाळेला
चर्चेलास बोलावल्यानंतर तो टॉवरवरून खाली आला आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.
धुळीच्या प्रदूषणामुळे दहा ते बारा शेतकर्‍यांची पिके करपली आहेत. कृषी विभागाच्या पाहणीत 70 ते 75 टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. स्फोटांमुळे घरांना तडे गेले, विहिरींची पाणीपातळी खालावली. धक्कादायक म्हणजे मंडल अधिकारी योगिता भोये यांनी प्रत्यक्षात सुरू असलेले नऊ खाणपट्टे अहवालात शेततळे म्हणून दाखवले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजपर्यंत वातावरणाची चाचणीच घेतली नाही. परवानगी नसताना लाखो ब्रास गौणखनिजाचे उत्खनन झाले. हा माल गेला कुठे, याचा हिशेब कोण देणार? महसूलमंत्र्यांपर्यंत विषय जाऊनही कारवाई केली जात नाही. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का, असा सवाल शेवाळे याने उपस्थित केला आहे.

Youth protest at tower against illegal mining

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *