महापालिकेचे पाण्यासाठी नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
शहरात दीड वर्षाने होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी सुविधांबाबत नियोजन सुरू आहे. सिंहस्थात सर्वाधिक आवश्यकता पाण्याची असेल. ही गरज लक्षात घेत सिंहस्थात 260 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची प्रतिदिन वाढ केली जाणार आहे. शहराला 520 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात वार्षिक सरासरी साडेपाच टक्के वाढ धरून सध्या 680 दशलक्ष लिटर पाणी वितरण होते. सिंहस्थ कालावधीत जवळपास 940 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन केला जाणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सिंहस्थासाठी येणारे साधू, महंत तसेच भाविकांसाठी प्रतिमाणशी पिण्याचे आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि ड्रेनेज यांसारख्या महत्त्वाच्या सेवांची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने जवळपास 15 हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. यात महापालिकेने रस्ते आणि पाणीपुरवठा या दोन बाबी प्रामुख्याने हाती घेतल्या असून, दररोज होणार्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्याबरोबर जलकुंभांची संख्या वाढविणे, नवीन जलवाहिन्या, तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे, जलशुद्धीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने संबंधित कामे सुरू आहेत. शहराला सध्या प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून 680 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचे वितरण 2027-28 मध्ये केले जाणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणार्या साधुग्राममध्ये सुमारे दहा लाख साधू-महंत उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून 150 दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि सिंहस्थ पर्वणी व इतर कालावधीत दररोज सुमारेे एक कोटी भाविकांची संख्या लक्षात घेता 110 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थात महापालिकेला दररोज एकूण 940 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे.
जलकुंभांची संख्या 153 होणार
महापालिकेच्या सहा विभागांत एकूण 119 जलकुंभ कार्यरत आहेत. या जलकुंभांची साठवण क्षमता 199 दशलक्ष लिटर आहे. 119 जलकुंभांव्यतिरिक्त सध्या शहरात 30 जलकुंभांची कामे प्रगतिपथावर असून, त्यात सर्वाधिक नऊ जलकुंभांची संख्या पंचवटीत आहे. या तीस जलकुंभांची साठवणक्षमता 60 दशलक्ष लिटर होणार आहे. त्याचबरोबर नाशिक पूर्व, पंचवटी आणि सातपूर या तीन विभागांत चार जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे आठ दशलक्ष लिटर पाण्याची साठवण करता येईल.
Additional 260 million liters of water will be required in Simhastha