पाणीमीटर नादुरुस्त; मनपाच्या नागरिकांना नोटिसा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराला दररोज सुमारे साडेपाचशे ते सहाशे एमएलडी (दशलक्ष) पाणीपुरवठा करून शहरवासीयांची तहान भागविण्याचे काम केले जाते. दरम्यान, शहरातील नागरिकांनी घेतलेल्या नळकनेक्शनचे पाणीमीटर मोठ्या संख्येने नादुरुस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार सर्वेक्षणातून समोर आला होता. नागरिकांनी खराब झालेले पाणीमीटर दुरुस्त करून घ्यावे, यासाठी गेल्या आठवड्यापासून नोटिसा धाडल्या जात आहेत. आतापर्यंत पाचशे नळधारकांना नोटिसा दिल्या आहेत.
पालिकेने शहराला पुरवल्या जाणार्या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी खासगी संस्थेमार्फत जलमापक (पाणीमीटर) नियमितपणे व्यवस्थित सुरू आहे का नाही, याची तपासणी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या सर्वेक्षणातून सुमारे एक लाखापर्यंत जलमापक सदोष असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. दरम्यान, सदर जलमापक बदलण्यात यावे, याकरिता मनपाच्या कर विभागाकडून येत्या दहा ते बारा दिवसांत एक लाख नागरिकांना नोटिसा धाडणार आहेत. शहरात 2 लाख 17 हजार नळकनेक्शनधारक आहेत. यातील बरेच जलमापक सदोष आहेत. त्यामुळे पाणी किती वापरले गेले, याची निश्चित माहिती मिळत नाही. याकरिता नागरिकांनी त्यांच्याकडील खराब पाणीमीटर बदलून घ्यावे, याकरिता पालिकेच्या कर विभागाकडून नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे.
पाणीपट्टी देयके वाटपासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर सव्वाशे कोटीच्या पुढे गेला आहे. पालिकेने 2024 मध्ये पाणीपट्टीच्या देयक वाटपाबरोबरच अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी पुण्यातील क्रेनबेरी या खासगी मक्तेदाराला काम दिले आहे. त्यानंतर नोव्हेंबर 24 पासून शहरातील नळ जोडण्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नळजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात नळजोडणीधारकांची संपूर्ण माहिती, मोबाइल क्रमांकासह नळजोडणी आकाराची मंजुरी, प्रत्यक्ष आढळलेली नळजोडणीची तपासणी करण्यात आली.
सर्वेक्षणात मीटरबाबत आढळलेल्या त्रुटी
मातीखाली गेलेले – 20546
फोटो न घेता आलेले – 19526
मीटर नसलेले – 15967
चेंबर खाली गेलेले – 4123
संपर्क तुटलेले – 2207
जलमापक तपासणीचे काम हाती घेतले असता मोठ्या संख्येने जलमापक सदोष असल्याचे समोर आले आहे. ज्या नागरिकांचे जलमापक नादुरुस्त, निकृष्ट आहे, अशाना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी खराब मीटर बदलून घ्यावे.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा
Meter broken in lakh-worth house in city