नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा; शिंदेसेनेला धडधड

पडघम विधान परिषदेचे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरासह जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात
नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, नाशिकच्या जागेवरून महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने थेट नाशिकच्या जागेवर दावा ठोकल्याने शिंदेसेनेची धडधड वाढली आहे. वाढीव संख्याबळाच्या आधारावर भाजपने नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. परंतु, या शिंदेसेनेला हा दावा मान्य नसून, ही जागा सोडणार नसल्याची भूमिका स्थानिक व वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.
महायुतीत राज्यातील अद्याप कुठल्याही जागांचे सूत्र ठरलेले नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व रायगड या जागा मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे. नाशिकचे मैदान सोडण्यासाठी शिंदेसेना तयार नाही. निवडणूक जाहीर होताच पक्षांतर्गत इच्छुक सक्रिय झाले असून, त्यामध्ये माजी आ. नरेंद्र दराडे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते व आ. सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या नावाची चर्चा होते आहे. दराडे यांना उमेदवारी देण्यास पक्षातीलच काही पदाधिकार्‍यांचा विरोध आहे. पक्षासाठी झटणार्‍या प्रामाणिक पदाधिकार्‍यांना संधी मिळावी, अशी भावना पक्षातून व्यक्त होत आहे. शिंदेसेनेत एकीकडे तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी असतानाच, दुसरीकडे भाजपने थेट जागेवरच दावा केल्याने यामुळे इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेनेने नाशिकची जागा जिंकली असली तरी, भाजपने त्यांच्याकडील वाढीव संख्याबळाच्या आधारे नाशिकची जागा आम्हीच लढवणार, अशी भूमिका घेतल्याचे सद्यस्थित दिसते आहे. भाजपकडे 191 तर शिंदेसेनेकडे 171 सदस्यांचे संख्याबळ आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार आहे. त्यांच्याकडे 107 संख्याबळ आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने शिंदेसेनेऐवजी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची चर्चा सुरू होत आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यास 2018 प्रमाणे स्वबळावर विधान परिषदेची निवडणूक झाल्यास अशावेळी राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक
ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी नाशिकची जागा प्रतिष्ठेची?
नाशिक विधान परिषदेची जागा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, त्याआधी झालेल्या विधानसभेत शहरातून तीन आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधान परिषदेत भाजपच्या बाजूने निकाल लागण्याची पूर्ण खात्री असल्यानेच नाशिकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

राष्ट्रवादीचा दावा, पण कुठपर्यंत?
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षानेदेखील नाशिकच्या जागेवर दावा केला आहे, मात्र हा दावा कुठपर्यंत टिकेल, यावरून शंका आहे. मुळात राष्ट्रवादीकडे भाजप व शिंदेसेनेपेक्षा तुलनेने मतदारांचे संख्याबळ आहे.

BJP claims Nashik seat; Shinde Sena is in shock

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *