– सविता एरंडे
“काय हे विजू? अगं किती वेळ कामाला?
घड्याळात किती वाजले पाहिलंस का? … बारा वाजून गेले तरी, तुझा अजून पत्ता नाही…
शेवटी वाट बघून भांडी घासायला घेतली…”
विजू काहीच न बोलता माझ्याजवळ आणि..
“ठेवा ठेवा ती भांडी… आता म्या आले न? आत्ता घासून देते बघा..”
“अगं पण हे तुझं नेहमीचंच झालंय बरं का?…”
“अवं ताई, म्या तरी कुटं कुटं पुरं पडू सांगा ना…!”
“आता काय झालं आणखी?..”..मी.
“अवं ताई, म्या कामावर यायला निघाले आन् तेवड्यात माज्या नवर्याला कुनीतरी गाडीनं ठोस दिली म्हनून शेजारचा रामू सांगत आला… म्या तडक निगाले तर, माज्या नवर्याला कामावर जाताना कुठल्या तरी गाडीनं जोरात ठोस दिली, आन् त्याचं डोस्कं जोरात दगडावर आपटलं आन् ही मोटी खोक पडलेली आन् त्याचा समदा सदरा रगतानं भिजलेला….म्या तर घाबरूनच गेले बगा…म्या लागलीच त्येला दवाखान्यात घेऊन गेले… डोक्याला पट्टी केली..त्येला घरी जाऊन निजवलं आन् म्या तडक हिकडंच आले…”
माझी बोलतीच तिने बंद केली…अशा वेळी काय बोलणार ना? …. मी मनात विचार केला खरंच आपण जर तिच्या जागी असतो तर काय केलं असतं?… तिचंही बरोबर आहे ना?… होतं असं कधी कधी…
“बरं, आता पटापट आवर…”
ती कामाला लागली… माझं सहज कॅलेंडरकडं लक्ष गेलं…. अरे हो.. काल
मधुरा म्हणत होती मला..“अगं या महिन्यात अधिकमासाला सुरुवात होते आहे..”
आणि खरंच, परवापासून अधिक महिना सुरू होतोय… दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. यालाच मल मास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या अधिक मासात लग्न, मुंज, वास्तुशांती, साखरपुडा,
यासारखी कार्ये करू नयेत असं म्हटलं जातं. सर्वांनी जास्तीत जास्त वेळ आध्यात्मिक वाचन, श्रवण, मनन, चिंतन, नामस्मरण यात घालवून जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करावा… म्हणूनच हा पुण्यदायी महिना मानला जातो. श्री विष्णू भगवान, श्रीकृष्ण यांची भक्ती करून त्यांचे कृपाशीर्वाद मिळावे म्हणून लोक विविध प्रकारे त्यांची आराधना करतात. बरेच लोक या महिन्यात गोरगरीब, गरजू लोकांना आपल्या जमेल तसा दानधर्म करतात. याच महिन्यात मुलीला लक्ष्मीचं रूप व जावईबापू हे नारायणाचं रूप आहे, असं समजून बरेच मातापिता आपल्या मुलींना अधिक वाण देतात. अनारसे, बत्तासे यांसारख्या तत्सम पदार्थाचे वाण देतात. मुलींची खणानारळानं ओटी भरतात… असं माझं थोडंसं चिंतन चालू होतं तेवढ्यातच फोन वाजला…
“हॅलो, मधुरा, बोल काय म्हणते आहेस?”…
“अगं, या वर्षी आपल्याला भागवत ऐकण्याची संधी मिळते आहे.” ..
“काय भागवत? आणि कधीपासून? कुठे?..”
“अगं, मी तुला म्हणाले होते ना, की या महिन्यात अधिक महिना सुरू होतो आहे.परवापासूनच अधिक महिना सुरू होतोय.”
“अगं हो, मी आत्ताच कॅलेंडरवर पाहिलं आणि तेच विचार माझ्या डोक्यात होते…. बरं कुठे आहे भागवत?…”
“अगं, अगदी जवळ आहे. आपल्या जवळच्या साक्षात्कारी दत्त मंदिरात.. फक्त पाच दिवस, संध्याकाळी सात ते नऊ”.. यावर्षी आपण नक्की जायचं बरं का?…
“हो, हो, नक्की जाऊ. मला पण ऐकायची खूप इच्छा आहे..” असं म्हणून आम्ही एकमेकींचा निरोप घेत फोन खाली ठेवला.
या वर्षी मलादेखील माझ्या लेकीला….जाईला व जावई बापूंना अधिक वाण करावं लागेल…
तिला कधी वेळ आहे ते विचारावं तरी म्हणून मी लगेचच फोन लावला…
“हॅलो जाई, कशी आहेस ? तब्येत बरी आहे ना ?”…“हो आई, छान आहे तब्येत. खरं तर मीच तुला विचारायला हवं.. तुझी तब्येत कशी आहे ?
म्हणून…” “अगं, वेडाबाई,आईला सदैव लेकीच्या तब्येतीची काळजी असते. म्हणून फोन लावला की आपोआपच तुझ्या तब्येतीविषयी विचारलं जातं. बरं,ऐक ना, परवापासून अधिक महिना सुरू होतोय.आणि….” “हं,हं,.. मला माहीत आहे, पुढं तू काय बोलणार आहेस ते !”…जाई म्हणाली. मग, सांग ना, या रविवारी तुला व जावई बापूंना माझ्या घरी यायला जमेल का ?…. “ आई , काय गं, प्रत्येक अधिक महिन्यात वाण करायलाच हवं का ? आता तुझंही वय झालंय….. कशाला उगाच दगदग करतेस गं?…” इति जाई..
“अगं मी काही नाही करणार…तू नको काळजी करूस… फक्त तुम्हाला दोघांना यायला जमेल की नाही, तेवढं सांग.”….
“ तू माझं ऐकणार नाहीस. तू तुझं तेच खरं करणार, हे माहित आहे मला..”
मी सचिनला (नवरा) विचारते व तुला फोन करते….
पण शक्यतो जमव गं.
वाण दिल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लाभणार नाही…. म्हणून तिनं व मी फोन बंद केला.
आजपासून दत्त मंदिरात भागवत सप्ताह सुरू म्हणून मी मंदिरात निघाले. निघण्यापूर्वी “तू पण निघ” असा मधुराला फोन केला. मंदिरात हळूहळू लोक यायला लागले होते. यावर्षी सर्व ग्रंथांचे, पोथी, पुराणे इ.चे गाढे अभ्यासक महाविद्वान महंत श्री कृपादास महाराज यांना भागवताचे निरूपण करायला निमंत्रित केले होते. मंदिरात अगदी शांत, प्रसन्न वातावरण होते.
बरोबर सात वाजता महंतांचे आगमन झाले.त्यांना फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. येताना सर्वजण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून नमस्कार करत होते. महंत आसनस्थ झाले. हरे कृष्ण हरे कृष्ण… या सुश्राव्य भजनाने भागवताच्या निरूपणाला प्रारंभ झाला. ….
श्री महंतांनी आपल्या शुभ वाणीला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना हात जोडून, डोळे बंद करायला सांगितले व भागवत श्रवणासाठी संकल्प मंत्राची संथा दिली. त्यानंतर प्रवचनाला शुभारंभ केला.
श्री महंतांनी अधिक महिन्याचे महात्म्य सांगून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गोर, गरीब, गरजू लोकांना दानधर्म केल्यास सर्वांत जास्त पुण्य आपल्याला मिळते. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना देण्यापेक्षा ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तुम्ही आपल्या मुलींना, जावयांना, ब्राह्मणांना, भाचे, आई इ.ना या महिन्यात अधिक वाण देता व थोडंसं पुण्य कमवता. परंतु गोरगरीब, रंजले गांजलेल्या लोकांना आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी मदत केली तर त्यासारखं सत्कर्म दुसरं कोणतंच नाही. कारण परमेश्वर मंदिरात कधीच नसतो. तो दीन, दुबळे, निराधार, श्रमिक लोकांना सहाय्य करायला गेलेला असतो. म्हणून तर म्हणतात ना…
नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात येथे हरी……
श्री महंतांच्या सुश्राव्य अशा भागवत श्रवणात सगळे भाविक तल्लीन झाले होते. त्यांच्या रसाळ व मधुर वाणीचा आस्वाद घेण्यासाठी श्री ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे आपल्या कानांच्या जणू काही जिव्हाच झाल्या होत्या. वेळ कसा गेला
समजलेच नाही.
शेवटी श्रीकृष्णाचे भजन सुरू झाले व समाप्ती झाली. मी श्री महंतांची सद्विचार मनात आठवत भारावलेल्या अवस्थेतच घरी आले. ….
दुसर्या दिवशी विजया नेहमीप्रमाणे कामाला आली. मी तिच्या नवर्याच्या तब्येतीची चौकशी केली आणि तुझा नवरा कुठं कामाला जातो? वगैरे विचारलं. त्यावर विजू म्हणाली,
“माझा नवरा लई लहरी हाय. … गेला तर जातो. न्हाय तर दोन दोन दिस जात न्हाय.”
का बरं? तू बोलत नाहीस का त्याला ?..मी बोलते ना, लई बोलते. पन काय हाय ना…त्यो ज्या मार्केट यार्डात जातो ते मार्केट यार्ड घरापास्नं लई लांब हाय बगा. मंग चालत जायाचा कटाळा करतो.
“असं होय. मला वाटलं दारू बिरू पिऊन झोपतो की काय.
“न्हाय, तेवडं एक न्हाई करत. माळकरी हाय ना त्यो.”
मी मनात म्हटलं, खरं आहे त्याचं पण…येत असेल कधी कधी कंटाळा. गरीब आहेत दोघं! पण कष्टाळू व विश्वासू आहेत.
माझ्या मनात श्री महंतांच्या अमृत विचारांचं मंथन चालूच होतं. त्यांनी अधिक महिन्यात जास्त सत्कर्म किंवा पुण्यदायक कर्म कोणतं तर… गोरगरीब, गरजू लोकांना मदत करणं….हे मंथन चालू होतं तेवढ्यातच माझी मनसखी कानात येऊन कुजबुजली… अगं तुला पुण्यकर्म करायची छान संधी आहे… अगं तुझ्याकडे दररोज कामाला विजया येते ना… आणि आत्ताच ती म्हणाली, माज्या नवर्याला मार्केट यार्डात लई लांब कामाला जावं लागतंय. अगं मग तू त्याला पण मदत करू शकतेस. त्याला सायकल घेऊन दे एखादी! बघ, त्यालाही याची गरज आहे. बघ, विचार कर! तिनं सुचवलं व तिचं बोलणं थांबलं.
अरे हो, खरंच की. आपल्याला हे नक्की जमेल. आपण आजच सायकलच्या दुकानात जाऊन जरा चौकशी करू, असा विचार करत मी खरोखरच सायकलच्या दुकानात जाऊन चौकशी केली व एक सायकल घेऊन द्यायचे निश्चित केले. तसे सायकल दुकानदाराला सांगून ठेवले व घरी आले. विजयाला फोन केला की, “विजू, उद्या कामाला येताना तुझ्या नवर्याला पण घेऊन ये. माझं जरा काम आहे.”…
ठरल्याप्रमाणे विजया तिच्या नवर्याला घेऊन आली. मी लवकर उठून स्वयंपाक केला होता. तिचं काम झाल्यावर मी तिला व तिच्या नवर्याला हाक मारली व आज मी तुम्हाला दोघांना जेवल्याशिवाय सोडणार नाही, असं म्हणत त्यांना दोघांना जेवायला बसवले. विजू लगेच म्हणाली, “ताई, अवं जेवण कशापाई? न्हाय बा, आमास्नी तुमच्याम्होरं जेवायची लई लाज वाटती. आमाला वाढून द्या. आमी घरी जाऊन खाऊ. तिचा नवराही तेच म्हणाला.
“अगं, त्यात कसली लाज? ते काही नाही. आज मी दोन घास तरी खाल्ल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही,” असं म्हणत दोघांना अगदी बळजबरीने जेवायला बसवले. जेवताना दोघांचेही चेहरे ओशाळवाणेच होते.
जेवण झाल्यानंतर विजयाची मी साडी, खण नारळ देऊन ओटी भरली. आणि आतल्या खोलीत ठेवलेल्या सायकलची पूजा केली आणि तिच्या नवर्याच्या कपाळाला गंध लावून ती सायकल त्याच्या हातात दिली व म्हटलं, हे बघ बबन, तुला दररोज खूप लांब कामावर चालत जायचा कंटाळा येतो ना ? म्हणून ही सायकल तुला घेऊन देते आहे.आता दररोज कामाला जायचं बरं का?
“अगं बाई ताई, तुमी काय बी न सांगता आमाला एकदम चकितच करून टाकलं. खरंच ताई तुमी अगदी देवमानूस हायसा.”
बबन पण म्हणाला, “ताई, लई लई उपकार केले तुमी आमच्यावर. म्या लई ठिकाणी जुनी सायकल बगत हुतो पन, एक बी पटली न्हाई. तुमी तर माज्या मनातलं वळखून सायकल मला दिली. तुमचं उपकार आमी कदी बी इसरणार न्हाई.” असं म्हणत दोघांनी देखील माझ्या पायावर डोकं ठेवलं. त्यांच्या चेहर्यावरचा तो स्वर्गीय आनंद पाहून मला साक्षात लक्ष्मीनारायण आपल्याला आशीर्वाद देत आहे असाच भास झाला.माझी मनसखी लगेच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाली. मग, झालीस ना तू खुश ? छान, छान.
मी तिला म्हणाले, “खरंच गं, माझं अधिकाचं वाण सार्थकी लागलं.” मी माझ्या मनसखीला धन्यवाद दिले.
सख्यांनो, आपल्या घराजवळ, समाजात अनेक गरजू लोकांना मदत करणार्या सामाजिक संस्था आहेत. त्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. त्यासाठी दररोज अधिक महिना आहे असं समजून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला शक्य असेल तसा मदतीचा खारीचा वाटा उचलायला हवा… आज मी पण खूप आनंदात होते. माझा मनमोर देखील आनंद मेघ पाहून नृत्य करत होता.तेवढ्यातच माझ्या लाडक्या लेकीचा फोन आला..“आई, या रविवारी आम्ही दोघेही अमेरिकेला एक महिन्यासाठी चाललो आहोत. माझ्या नणंदबाईंना अधिक वाण करण्यासाठी! त्यामुळे तुझ्याकडे यायला जमणार नाही गं. रागाऊ नकोस!
More variety