स्वप्नांच्या राखेत जगणारा माणूस

– अफजल पठाण
स्वप्नं होती डोळ्यांत, आभाळाला गवसणी
घालायची,
पण जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली वाटचाल
बदलून गेली…
स्वतःसाठी जगायचं होतं, काहीतरी बनायचं होतं,
पण कुटुंबासाठी जगता जगता स्वतःच हरवून गेलो…
जन्माला येणारा प्रत्येक माणूस काही ना काही स्वप्नं घेऊनच या जगात वावरत असतो. बालपणी मनात रंगवलेली ती स्वप्नं किती सुंदर असतात! कुणाला मोठा अधिकारी व्हायचं असतं, कुणाला डॉक्टर, कुणाला कलाकार, तर कुणाला आपल्या कर्तृत्वाने जग जिंकायचं असतं. त्या वेळी परिस्थितीची जाणीव नसते, जबाबदार्‍यांचे ओझे नसते आणि आयुष्य आपल्या मनाप्रमाणे घडेल असा विश्वास असतो. परंतु, काळ जसजसा पुढे सरकतो, तसतसा वास्तवाचा कठोर चेहरा समोर येतो. घरची परिस्थिती, आर्थिक अडचणी, कुटुंबाच्या गरजा, आई-वडिलांच्या अपेक्षा आणि रोजच्या जगण्याची धडपड यामध्ये सामान्य माणसाची स्वतःची स्वप्नं कुठेतरी हरवून जातात. तो आपल्या इच्छांवर माती टाकून कुटुंबासाठी जगू लागतो. कधी काळी मोठी स्वप्नं पाहणारा तो युवक आज दोन वेळच्या भाकरीसाठी धावत असतो. त्याच्या चेहर्‍यावर हसू असतं, पण मनाच्या खोल कप्प्यात अपूर्ण स्वप्नांची वेदना दडलेली असते. लोकांना त्याचा संघर्ष दिसतो, पण त्याने गमावलेली स्वप्नं दिसत नाहीत. कारण सामान्य माणूस आपल्या वेदनांचा बाजार मांडत नाही; तो शांतपणे दुःख सहन करत जगत राहतो.
जीवनाच्या प्रवासात अनेकांना आपले छंद, आवडी आणि आकांक्षा सोडाव्या लागतात. एखादा उत्कृष्ट गायक परिस्थितीमुळे कामगार बनतो, एखादा हुशार विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतो, तर एखादा कलाकार जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली आपली कला गाडून टाकतो. स्वप्नं मरत नाहीत, पण ती मनाच्या एखाद्या कोपर्‍यात कैद होऊन राहतात.
रात्री उशिरा जेव्हा तो एकटा असतो, तेव्हा त्याला स्वतःची जुनी स्वप्नं आठवतात. जर परिस्थिती वेगळी असती तर? हा प्रश्न त्याच्या मनाला टोचत राहतो. पण दुसर्‍याच क्षणी तो पुन्हा वास्तवात येतो, कारण उद्या पुन्हा कुटुंबासाठी
धावायचं असतं.
खरं तर समाजाचा खरा नायक हा सामान्य माणूसच असतो. तो स्वतःची स्वप्नं जाळून आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख देतो. स्वतःच्या इच्छा दाबून आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्य खर्च करतो. त्याच्या त्यागाला पुरस्कार मिळत नाहीत, त्याच्यावर चित्रपट बनत नाहीत, पण अनेक कुटुंबांच्या सुखामागे त्याचे अश्रू आणि संघर्ष दडलेले असतात.
आज प्रत्येकाने आपल्या आसपासच्या अशा सामान्य माणसाला समजून घेण्याची गरज आहे. कारण प्रत्येक हसर्‍या चेहर्‍यामागे एक अपूर्ण स्वप्न असतं, प्रत्येक यशामागे एखाद्याचा त्याग असतो आणि प्रत्येक कुटुंबाच्या आनंदामागे एखादा सामान्य माणूस स्वतःची स्वप्नं गमावून उभा असतो.
जगण्यासाठी जगताना, जगणंच हरवून बसलो,
स्वप्नांच्या मागे धावताना, स्वप्नांपासून दूर निघून गेलो…
पण आजही आशेचा दिवा मनात तेवत आहे,
कारण माझी स्वप्नं जरी अपूर्ण राहिली, तरी माझ्या माणसांच्या चेहर्‍यावरचं हास्यच माझं खरं यश आहे…

A man living in the ashes of dreams

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *