– विष्णू वाघ
निसर्ग, शेती आणि पक्षी हे एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. या तिन्ही घटकांमुळे पृथ्वीवरील जीवन समृद्ध आणि संतुलित राहते. निसर्गाशिवाय शेती शक्य नाही आणि पक्ष्यांशिवाय निसर्ग अपूर्ण आहे. म्हणूनच “निसर्ग वाचवा, शेती वाचवा आणि पक्षी जपा” हा संदेश आजच्या काळाची गरज बनली आहे.
शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. पाऊस, सूर्यप्रकाश, हवा, माती आणि पाणी या नैसर्गिक घटकांमुळे पिकांची वाढ होते. योग्य वेळी पडणारा पाऊस शेतकर्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो, तर दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस संकट निर्माण करतो. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न तयार करतात आणि सुपीक मातीमुळे भरघोस उत्पादन मिळते. त्यामुळे निसर्ग हा शेतकर्याचा खरा मित्र मानला जातो. पक्षी हे निसर्गाचे संवेदनशील दूत आहेत. ऋतू बदलण्याची चाहूल त्यांना आधी लागते. अनेक पक्ष्यांच्या हालचालींवरून पावसाचे आगमन किंवा हवामानातील बदल ओळखता येतात.
कोकीळेचा आवाज, चिमण्यांचा किलबिलाट किंवा स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन हे निसर्गातील बदलांचे संकेत असतात. ग्रामीण भागात आजही पक्ष्यांच्या हालचालींवरून हवामानाचा अंदाज बांधला जातो. चातक पक्षाला तर निसर्गातील प्रत्येक घडामोडींची चाहूल लागते. पक्षी शेतीसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. ते पिकांवरील हानिकारक किडी खातात आणि नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण करतात. मधमाश्या व इतर पक्षी परागीभवनास मदत करून उत्पादन वाढवतात. काही पक्षी बियांचे प्रसारण करून नवीन वनस्पती उगवण्यास मदत करतात. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
परंतु, आधुनिक जीवनशैलीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. झाडांची तोड, वाढते प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिरेक, पाण्याचा अपव्यय आणि मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पतंगाच्या दोर्याने देखील अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागतो ती काळजी मानवाने घेणे आवश्यक आहे. चिमण्या, साळुंक्या आणि अनेक स्थलांतरित पक्षी आता दुर्मिळ होत चालले आहेत. हवामान बदलामुळे शेतीवरही मोठे संकट निर्माण झाले आहे.
आजच्या काळात शाश्वत आणि निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, जलसंधारण, वृक्षलागवड, पक्ष्यांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवता येईल. मुलांना निसर्ग आणि पक्ष्यांशी जोडणे ही देखील काळाची गरज आहे. पहाटे व सायंकाळी पक्षांचा किलबिलाट मानवी जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करतो. पक्षी हे मानवी जीवनात एक नवचैतन्य निर्माण करतात, पाऊस सुरू असताना मोर पक्षाचा पिसारा असेल किंवा सुगरणीचा विणलेला खोपा असेल ते बघत असताना एक मानसिक समाधान मिळते. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांचा काव काव आवाज या निसर्गातील छोट्या गोष्टीचा आनंद घेतला तर खूप मोठा मिळतो. हवामानाचा अंदाज देखील निसर्गातील छोट्या छोट्या बदलातून वर्तविला जातो.पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार शेती आणि स्वच्छ निसर्ग हे समृद्ध जीवनाचे प्रतीक आहेत. निसर्ग आनंदी असेल तर शेती समृद्ध राहील आणि मानवाचे जीवनही सुखी बनेल.शेती, पक्षी आणि निसर्ग यांचे हे अतूट नाते बनलेले आहे. म्हणून प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
The unbreakable bond between agriculture, birds and nature