फुलेनगर गोळीबार प्रकरणातील नऊ महिन्यांपासून फरार मुख्य संशयित जेरबंद

पंचवटी गुन्हे शोध पथकाची कारवाई

पंचवटी : प्रतिनिधी
फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात झालेल्या दोन गटांतील दगडफेक आणि गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून हुलकावणी देणार्‍या विकास ऊर्फ विकी विनोद वाघ (26, रा. मरीमाता मंदिराच्या मागे, पाटकिनारी, फुलेनगर) याच्यासह त्याचा साथीदार किरण रामदास मोरे (वय 18, रा.
फुलेनगर) या दोघांना पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. मुख्य संशयित विकी वाघ याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात यापूर्वीच सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गेल्या वर्षी 22 जुलै 2025 रोजी फुलेनगरमधील मुंजाबा चौक परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वादातून जोरदार दगडफेक आणि गोळीबार झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर मुख्य संशयित विकी वाघ हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. पोलीस गेल्या नऊ महिन्यांपासून त्याच्या मागावर होते.
गुन्हे शोध पथक तपास करत असताना अंमलदार अंकुश काळे व नितीन पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित विकी वाघ आणि किरण मोरे हे नाशिकरोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ नाशिकरोड परिसरात सापळा रचून अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला.
ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, गणेश आगोणे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, योगेश वायंकडे, विनोद चितळकर, नितीन पवार, अंकुश काळे आणि संतोष पाटील यांच्या पथकाने केली.

The main suspect in the Phulenagar shooting case, who has been absconding for nine months, has been arrested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *